इयत्ता १२ वीच्या परीक्षेत गैरप्रकार; CCTV व उत्तरांच्या झेरॉक्स प्रतींवरून १९ जणांवर कठोर कारवाई
दक्षता समितीच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्वात मोठी परीक्षा कारवाई
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि. १० :-
जिल्ह्यातील इयत्ता १२ वीच्या परीक्षेदरम्यान आढळून आलेल्या गैरप्रकाराच्या प्रकरणात दक्षता समितीच्या आदेशानुसार जिल्ह्यातील आजवरची सर्वात मोठी आणि कठोर परीक्षा-संबंधित कारवाई करण्यात आली आहे.
कन्नड तालुक्यातील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालय, जैतापूर येथे इंग्रजी विषयाच्या परीक्षेदरम्यान काही विद्यार्थ्यांकडून नक्कल होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाने तातडीने तपासणी सुरू केली.
CCTV फुटेजमुळे गैरप्रकार उघड
परीक्षा केंद्रावर उपलब्ध असलेल्या CCTV फुटेज व उत्तरांच्या झेरॉक्स प्रतींच्या आधारे सखोल तपासणी करण्यात आली. तपासणीत विद्यार्थ्यांकडून एकमेकांच्या उत्तरपत्रिकांकडे पाहून गैरप्रकार केल्याचे स्पष्ट झाले.
केंद्र संचालकासह १९ जणांवर कारवाई प्रस्तावित
या प्रकरणात परीक्षा केंद्र संचालकासह एकूण १९ पर्यवेक्षक व संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.
यामध्ये जिल्हा परिषद कर्मचारी असलेल्या पर्यवेक्षक शिक्षकांविरुद्ध निलंबनाचे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. तसेच इतर संस्थांतील कर्मचाऱ्यांविरोधात त्यांच्या संस्थेमार्फत शिस्तभंगात्मक व कायदेशीर कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले आहेत.
संपूर्ण स्टाफ बदलला; पुढील परीक्षा कडक देखरेखीखाली
गैरप्रकाराची गंभीरता लक्षात घेता प्रशासनाने तात्काळ निर्णय घेत परीक्षा केंद्रावरील संपूर्ण स्टाफ बदलून नव्याने नियुक्त कर्मचाऱ्यांना परीक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
“उपरवाला सब देख रहा है”चा प्रत्यय देणारी घटना
ही कारवाई शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती अश्विनी लाठकर यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकाने केली असून, दक्षता समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित, विभागीय बोर्ड अध्यक्ष श्री अनिल साबळे यांच्या आदेशानुसार ही कठोर कारवाई राबविण्यात आली.
CCTV च्या माध्यमातून प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जात असल्याने परीक्षा प्रक्रियेत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे.
पारदर्शक परीक्षा प्रक्रिया ही सामूहिक जबाबदारी
या घटनेतून सर्व परीक्षा केंद्र संचालक, पर्यवेक्षक व संबंधित घटकांनी भविष्यात परीक्षा पारदर्शक, शिस्तबद्ध आणि नियमांनुसार घेणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
परीक्षेतील शिस्त मोडणाऱ्यांसाठी हा मोठा इशारा असून, प्रशासनाचा संदेश स्पष्ट आहे — गैरप्रकाराला अजिबात माफी नाही!