अंभईत तुफान राडा! बकऱ्यांच्या व्यवहारातून वाद चिघळला; ६ जण गंभीर जखमी, १५ जण ताब्यात
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २५ :- जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अंभई गावात काल मध्यरात्री दोन गट आमनेसामने येत मोठा राडा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बकऱ्यांच्या खरेदी-विक्री व्यवहारातून सुरू झालेला किरकोळ वाद क्षणात चिघळला आणि त्याचे रूपांतर मारामारी, घोषणाबाजी व दगडफेकीत झाले. या घटनेत ५ ते ६ जण गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत १५ जणांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व्यवहारावरून झालेल्या वादानंतर दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. परिस्थिती इतकी बिघडली की, जमावाने १५ ते २० वाहनांची तोडफोड केल्याची माहिती आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
या वादाला पुढे राजकीय रंगही चढल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे समर्थक आणि भाजप कार्यकर्ते असे दोन गट आमनेसामने आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही.
घटनेवेळी सुमारे ५०० ते ६०० नागरिकांचा जमाव गावात जमल्याचे सांगितले जाते. परिस्थिती तणावपूर्ण होताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत गावात तळ ठोकला. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे.
दरम्यान, आमच्या प्रतिनिधींनी अंभईचे पोलीस पाटील दगडू मैंद यांच्याशी संपर्क साधला असता, “गावात सध्या शांतता असून तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.
सध्या गावात मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तैनात असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
गावात शांतता प्रस्थापित होईल का, की या वादाचे पडसाद अजून उमटणार? 👀