वैष्णवीचा मार्ग मोकळा! कर्मयोगी फाऊंडेशनने २४ हजारांची दिली मदत
वैष्णवीचा परीक्षेचा मार्ग मोकळा करत कर्मयोगीने साधला कर्मयोग
महाराष्ट्र वाणी न्युज
हिंगणा (नागपूर), २९ जुलै :- बालवयात वडिलांचे छत्र हरवलेल्या आणि अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही शिक्षणाची जिद्द न सोडणाऱ्या वैष्णवी लिडबेच्या परीक्षेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. 'बीएससी अॅनेस्थेसिया' कोर्सच्या अंतिम वर्षाच्या शुल्कासाठी आवश्यक असलेल्या २४ हजार रुपयांची मदत कर्मयोगी फाऊंडेशनने पुढाकार घेत करताच तिच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमटले.
वैष्णवी सावंगी (मेघे) येथे शिकत असून, तिची आई शेतमजुरी करून दोन्ही मुलींचा खर्च भागवत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे यावर्षीच्या परीक्षेची फी भरणे अशक्य झाले होते. मदतीसाठी वैष्णवीने कर्मयोगी फाऊंडेशनच्या संस्थापक पंकज ठाकरे यांच्याशी संपर्क साधला. सुरुवातीला त्यांनी मदतीस असमर्थता दर्शवली होती, मात्र वैष्णवीची कथा ऐकल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर मदतीचे आवाहन केले.
या आवाहनाला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आणि अवघ्या २४ तासात २४ हजारांची रक्कम जमा झाली. २८ जुलै रोजी ही रक्कम वैष्णवीला सुपूर्त करण्यात आली.
कर्मयोगी फाऊंडेशनने याआधीही वैष्णवीच्या शिक्षणासाठी दोन वर्षांत ७१ हजारांची मदत केली आहे. आता अंतिम वर्षाची फीही भरली गेल्याने वैष्णवीला ऑगस्टमधील परीक्षा देता येणार आहे.
"जर ती माझी मुलगी असती, तर मी काय केलं असतं?" या भावनिक विचारातून जन्मलेली ही मदत वैष्णवीसारख्या जिद्दी मुलीसाठी नवी आशा ठरली आहे.
शिक्षणासाठी झगडणाऱ्या प्रत्येक वैष्णवीला अशीच साथ मिळो – हीच अपेक्षा!