अंभईतील तणावानंतर शांतता समितीची बैठक; दोषींवर कडक कारवाई होणार – उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोल्हे
महाराष्ट्र वाणी
अंभई (प्रतीनीधी) :- सर्व जाती-धर्मांतील लोकांनी गुण्यागोविंदाने राहण्याची महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा आहे. अंभई गाव आणि परिसरात काही गैरसमज व क्षुल्लक कारणावरून वाद निर्माण झाला असला तरी सामाजिक शांतता टिकवण्यासाठी सामोपचाराची भूमिका घेणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कोल्हे यांनी केले.
अंभई येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. गावात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता आणि सलोखा कायम राखावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असून कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असेही कोल्हे यांनी स्पष्ट केले.
यावेळी अजिंठा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल ढाकणे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करत गावात शांतता व सौहार्द राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
बैठकीस अंभई गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावातील सलोखा टिकवण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांनीही पुढाकार घेतल्यासच अंभईत पुन्हा शांततेचे वातावरण कायम राहणार आहे.