५ स्टार मसाले कंपनीवर FDA चा छापा; २.८ टन मसाला साठा जप्त, परवाना निलंबित!
हळद, मिरची, धणे पावडर आणि मटण मसाल्याचा १६ लाख ४० हजार ९०० रुपयांचा साठा जप्त; गाढे जळगाव येथील उत्पादन युनिटवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ३१ :- नागरिकांना सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी राबविण्यात येत असलेल्या 'Safe Food Safe Maharashtra' मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई केली आहे. गाढे जळगाव येथील मेसर्स ५ स्टार मसाले या उत्पादन आस्थापनावर छापा टाकून तब्बल २ हजार ८०२ किलो विविध मसाल्यांचा साठा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या मालाची किंमत १६ लाख ४० हजार ९०० रुपये असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या कारवाईनंतर संबंधित उत्पादन युनिटचा अन्न परवानाही तातडीने निलंबित करण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी पी. एस. कुचेकर यांच्या पथकाने गट क्रमांक २९९/पी, गाढे जळगाव, छत्रपती संभाजीनगर येथील कारखान्याची तपासणी केली. या तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्याने प्रशासनाने संबंधित मसाल्यांचा साठा जप्त करण्याची कारवाई केली.
चार प्रकारच्या मसाल्यांचा मोठा साठा जप्त
या कारवाईमध्ये विविध प्रकारच्या मसाल्यांचा समावेश असून त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
- हळद पावडर : ४८८ किलो, किंमत २ लाख ४४ हजार रुपये.
- मटण मसाला : ७९८ किलो, किंमत ५ लाख १८ हजार ७०० रुपये.
- मिरची पावडर : ९१८ किलो, किंमत ४ लाख ५९ हजार रुपये.
- धणे पावडर : ५९८ किलो, किंमत २ लाख ३९ हजार २०० रुपये.
अशा प्रकारे एकूण २ हजार ८०२ किलो मसाला साठा जप्त करण्यात आला असून त्याची एकत्रित किंमत १६ लाख ४० हजार ९०० रुपये आहे.
जप्त माल सील; पुढील आदेशापर्यंत देखरेखीखाली
कारवाईदरम्यान संतोष मारुती भुते (रा. हर्सूल, छत्रपती संभाजीनगर) हे पंच म्हणून उपस्थित होते. जप्त केलेला संपूर्ण साठा नियमानुसार सील करण्यात आला आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत हा माल संबंधित अन्न व्यावसायिक श्री. शेख रेहमत शेख फसाद पटेल यांच्या ताब्यात सुरक्षिततेसाठी ठेवण्यात आला आहे. या साठ्यात कोणताही बदल अथवा छेडछाड करू नये, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
अन्न परवाना निलंबित; कारवाईचा इशारा
या प्रकरणात अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ मधील कलम ३(१)(झेडएक्स), २६(२)(ii), २७(१) आणि ५१ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच संबंधित उत्पादन युनिटचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे.
नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्नपदार्थांच्या गुणवत्तेशी संबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिला आहे.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित