"वाळू माफियांना संरक्षण महागात! अंबडचे तहसीलदार ६.४० लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात"
महाराष्ट्र वाणी
जालना (प्रतिनिधी) दि ६ :- जालना जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतूक प्रकरणात महसूल विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडल्याने खळबळ उडाली आहे. अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांना ६ लाख ४० हजार रुपयांची लाच घेताना शनिवारी अटक करण्यात आली.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या वाळू उपसा व्यवसायाशी संबंधित पोकलँड मशीनवर कारवाई न करणे तसेच वाळू वाहतूक करणारे सहा हायवा ट्रक विनाअडथळा सुरू ठेवण्यासाठी तहसीलदारांनी मोठ्या रकमेची मागणी केली होती. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीने प्राथमिक पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर बीड येथील एसीबीच्या पथकाने उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर येथे सापळा रचला. ठरल्याप्रमाणे लाचेची रक्कम स्वीकारताच पथकाने तहसीलदार विजय चव्हाण यांना ताब्यात घेतले.
या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीच्या साखळीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवरही चर्चा सुरू झाली आहे. पुढील तपास एसीबीकडून करण्यात येत आहे.
👉 भ्रष्टाचाराविरोधातील अशा महत्त्वाच्या घडामोडींसाठी वाचा ‘महाराष्ट्र वाणी’ — सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांचा साथी!