रात्री घरफोडी करणारी टोळी जेरबंद; २ गुन्हे उघड — १.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ८ :- रात्रीच्या वेळी घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अखेर जेरबंद करत दोन घरफोड्यांचा उलगडा केला आहे. या कारवाईत सुमारे १ लाख ५८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
देवगाव रंगारी परिसरात १४ ते १५ मार्च दरम्यान दोन बंद घरांमध्ये चोरी झाल्याची तक्रार नोंद झाली होती. अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप कटरने तोडून एलसीडी टीव्ही, सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तब्बल २४ दिवस तपास करत होते. सीसीटीव्ही फुटेज, गुप्त माहितीदार आणि संशयितांची चौकशी याच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला.
दरम्यान, गंगापूर-भेंडाळा रोडवर सापळा रचून पोलिसांनी संशयितांना पकडण्याचा प्रयत्न केला असता एक आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून गेला. मात्र, रामेश्वर जंगल्या भोसले (वय २८, रा. बीड) याला ताब्यात घेण्यात आले.
सखोल चौकशीत त्याने साथीदारांसह दोन्ही घरफोड्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेला एलसीडी टीव्ही, सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण १.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास देवगाव रंगारी पोलीस करत आहेत.
👉 कायद्याचा धाक कायम — गुन्हेगारांचा खेळ खल्लास!