रमजानमध्ये उर्दू शाळा सकाळीच भरवा! ‘हॅप्पी टू हेल्प फाउंडेशन’ची शिक्षण विभागाकडे जोरदार मागणी
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १४ :- पवित्र रमजान महिन्याला लवकरच सुरुवात होत असून, वाढत्या उष्णतेचा आणि उपवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता जिल्ह्यातील सर्व उर्दू माध्यमाच्या शाळा सकाळच्या सत्रात भरवाव्यात, अशी ठाम मागणी ‘हॅप्पी टू हेल्प फाउंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्य प्रवक्ता शेख अब्दुल रहीम यांनी केली आहे.
त्यांनी शिक्षण उपसंचालक आणि संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देत सांगितले की, रमजान काळात उर्दू शाळांमधील बहुतांश विद्यार्थी व शिक्षक रोजा (उपवास) पाळतात. दुपारच्या सत्रात कडक उन्हामुळे उपवास असलेल्या विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे शाळेची वेळ बदलणे अत्यावश्यक आहे.
शैक्षणिक कामकाजावर परिणाम होणार नाही
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, RTE Act 2009 नुसार प्राथमिक शाळांसाठी दररोज ५ तासांचे अध्यापन अनिवार्य आहे.
जर शाळा सकाळी ७:३० ते दुपारी १२:३० या वेळेत भरवल्या, तर नियमित अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकतो. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही आणि उन्हाचा त्रासही टळेल.
⏰ १८ फेब्रुवारीपासून वेळ बदल लागू करण्याची मागणी
शेख अब्दुल रहीम यांनी १८ फेब्रुवारी २०२६ पासून ही वेळ लागू करण्याची विनंती केली आहे.
ही परवानगी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका तसेच खाजगी अनुदानित व विनाअनुदानित अशा सर्व उर्दू माध्यमाच्या शाळांना मिळावी, अशी मागणी त्यांनी केली.
या निर्णयामुळे हजारो विद्यार्थी आणि शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
🏛 शिक्षण उपसंचालक कार्यालयाने घेतली दखल
छत्रपती संभाजीनगर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने निवेदनाची दखल घेत विभागातील सर्व जिल्ह्यांच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना नियमानुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
👀 आता सर्व उर्दू शाळांचे लक्ष शिक्षणाधिकाऱ्यांकडे!
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांच्या निर्णयाकडे आता सर्व उर्दू शाळांचे लक्ष लागले आहे.
✨ रमजानमध्ये विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार का? निर्णयाची प्रतीक्षा कायम!