मार्टी कृती समितीच्या पाठपुराव्याला यश; अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची ‘परदेश शिष्यवृत्ती योजना’ आता थेट अल्पसंख्याक आयुक्तालयामार्फत

मार्टी कृती समितीच्या पाठपुराव्याला यश; अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची ‘परदेश शिष्यवृत्ती योजना’ आता थेट अल्पसंख्याक आयुक्तालयामार्फत
मार्टी कृती समितीच्या पाठपुराव्याला यश; अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची ‘परदेश शिष्यवृत्ती योजना’ आता थेट अल्पसंख्याक आयुक्तालयामार्फत

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ३ :- अल्पसंख्याक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणाऱ्या ‘परदेश शिष्यवृत्ती योजने’च्या अंमलबजावणीत मोठा बदल करण्यात आला असून, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून ही योजना थेट अल्पसंख्याक आयुक्तालय, छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत राबविण्यात येणार आहे. या निर्णयामुळे योजनेची अंमलबजावणी अधिक वेगवान, पारदर्शक आणि परिणामकारक होणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

या निर्णयासाठी मार्टी कृती समिती महाराष्ट्र, विविध अल्पसंख्याक संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री, अल्पसंख्याक विकास मंत्री, अल्पसंख्याक आयुक्त तसेच संबंधित विभागांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. शासनाने या मागणीची दखल घेतल्याने राज्यातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शासनाने ही योजना २३ नोव्हेंबर २०२३ रोजी सुरू केली होती. त्यानंतर २१ ऑगस्ट २०२४ रोजी यामध्ये काही सुधारणा करण्यात आल्या. सुरुवातीला अल्पसंख्याक विभागाची स्वतंत्र यंत्रणा नसल्याने योजनेची अंमलबजावणी समाजकल्याण आयुक्तालय, पुणे यांच्यामार्फत केली जात होती. मात्र १४ मार्च २०२४ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे स्वतंत्र अल्पसंख्याक आयुक्तालय स्थापन झाल्यानंतर ही योजना त्या आयुक्तालयाकडे वर्ग करण्याची मागणी जोर धरू लागली होती.

या योजनेअंतर्गत मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, जैन, पारशी आणि ज्यू प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि पीएच.डी. अभ्यासक्रमांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. विद्यार्थ्यांची संपूर्ण शिक्षण फी, वार्षिक निर्वाह भत्ता, विमा, प्रवास खर्च आणि इतर मंजूर खर्च शासनाकडून उपलब्ध करून दिले जातात.

याबाबत प्रतिक्रिया देताना अॅड. वसीम कुरेशी यांनी सांगितले की, “अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. यामुळे शिष्यवृत्ती मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व प्रभावी होईल. यासाठी आम्ही मुख्यमंत्री, अल्पसंख्याक विकास मंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. राज्यातील पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.”

मार्टी कृती समिती महाराष्ट्रने सर्व पात्र विद्यार्थी व पालकांना आवश्यक कागदपत्रांची पूर्वतयारी करून शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

वाचा, शेअर करा आणि शिक्षणाच्या नव्या संधींची माहिती अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा!