२२ व्या वर्षी IPS! ‘बेबी फेस’मुळे कॉलेज बॉय समजला जाणारा अभिजीत पाटील आज तरुणांचा आदर्श
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २९ :- महाराष्ट्रातील ठाणे येथील अभिजीत पाटील यांनी अत्यंत कमी वयात UPSC परीक्षा उत्तीर्ण करून अनेक तरुणांसमोर प्रेरणेचा आदर्श ठेवला आहे. केवळ २२ व्या वर्षी IPS अधिकारी बनलेल्या अभिजीत यांची यशोगाथा सध्या सोशल मीडियावर आणि स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील निरागस लूकमुळे अनेकजण त्यांना कॉलेज विद्यार्थी समजतात; मात्र वर्दीवरील चमकणारे स्टार्स त्यांच्या मेहनतीची खरी ओळख करून देतात.
११ जून १९९९ रोजी ठाणे येथे जन्मलेल्या अभिजीत पाटील यांचे पूर्ण नाव अभिजीत तुळशीराम पाटील आहे. त्यांचे वडील मुंबई महानगरपालिकेत मुख्य लेखापरीक्षक म्हणून कार्यरत होते, तर आई सिंचन विभागात नोकरी करत होत्या. दोघेही आता निवृत्त झाले आहेत. अभिजीत यांच्या दोन मोठ्या बहिणी असून ते घरातील एकुलते एक मुलगे आहेत.
अभिजीत यांनी सिव्हिल आणि एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंगमध्ये बीटेक शिक्षण पूर्ण केले. विशेष म्हणजे इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षात असतानाच त्यांनी UPSC पूर्व परीक्षा उत्तीर्ण केली होती. फक्त इंटरनेट, पुस्तके आणि सेल्फ स्टडीच्या जोरावर त्यांनी ही कठीण परीक्षा पार केली. कोणत्याही मोठ्या कोचिंग क्लासचा आधार न घेता त्यांनी अवघ्या ८ महिन्यांत दररोज सुमारे ८ तास अभ्यास करून यश मिळवले.
एका यूट्यूब व्हिडिओमुळे त्यांच्या आयुष्याला नवे वळण मिळाले. इंजिनिअरिंग करत असताना त्यांनी एका UPSC टॉपरचा व्हिडिओ पाहिला आणि तेव्हाच प्रशासन सेवेत जाण्याचा निर्धार केला. त्यानंतर त्यांनी पूर्ण शिस्त, वेळेचे नियोजन आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर UPSC 2022 परीक्षेत ओबीसी प्रवर्गातून अखिल भारतीय ४७० वा क्रमांक मिळवला.
UPSC मुख्य परीक्षेत त्यांनी १७५० पैकी ७७२ गुण मिळवले, तर मुलाखतीत २७५ पैकी १८० गुण मिळवत एकूण ९५२ गुणांसह IPS पद मिळवले. सध्या ते राजस्थान कॅडरमध्ये कार्यरत असून चुरू जिल्ह्यातील राजगड येथे ASP पदाची जबाबदारी सांभाळत आहेत.
अभिजीत पाटील यांची कहाणी हेच दाखवून देते की मोठे क्लासेस, लाखो रुपयांची फी किंवा अनेक वर्षांचा संघर्ष याशिवायही UPSC सारखे स्वप्न पूर्ण होऊ शकते. योग्य दिशा, सातत्य आणि प्रामाणिक मेहनत असेल तर कमी वयही यशाच्या आड येत नाही.
“मोठी स्वप्नं पाहा… कारण मेहनतीसमोर वय आणि परिस्थिती दोन्हीही लहान पडतात!”