बिडकीन पोलिसांची धडाकेबाज कारवाई: गावठी कट्टा, धारदार शस्त्रांसह चार जणांना अटक

महाराष्ट्र वाणी न्युज
बिडकीन ता. पैठण, ६ जून :- गोपनीय माहितीच्या आधारे बिडकीन पोलिसांनी शेकटा फाटा येथे केलेल्या नाकाबंदी दरम्यान विनापरवाना गावठी कट्टा व धारदार शस्त्रे बाळगणाऱ्या चौघांना ताब्यात घेतले. ही कारवाई 5 जून रोजी मध्यरात्री करण्यात आली असून या कारवाईत पोलिसांनी तब्बल 4 लाख 54 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, पोलिस स्टेशन बिडकीनचे प्रभारी अधिकारी सपोनि निलेश शेळके यांच्या आदेशाने पोउपनि महेश घुगे, पोह/940 विष्णु गायकवाड, पोकॉ/193 सुरज ढवळे आणि पोकॉ/1771 योगेश वाघमोडे हे खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करत असताना रात्री 11:55 वाजता गोपनीय बातमी मिळाली की, काही इसम गावठी कट्टा आणि धारदार हत्यारांसह मुक्ताई पेट्रोलपंप परिसरात येणार आहेत.
ही माहिती गंभीरतेने घेऊन पोलिसांनी शेकटा चौफुली बिडकीन येथे नाकाबंदी केली. काही वेळातच एक तांबूस रंगाची हयुंडाई आय-20 चारचाकी (क्र. MH-08-Z-5067) या मार्गाने येताना आढळली. पोलिसांनी वाहन थांबवून चौकशी केली असता त्यामध्ये खालील चार इसम आढळले:
1. सचिन आप्पासाहेब काळे (वय 26, रा. मांडवा, ता. गंगापूर)
2. रोमन हरी शिंदे (वय 26, रा. मांडवा, ता. गंगापूर)
3. संदीप तुळशीराम खंडागळे (वय 26, रा. मांडवा, ता. पैठण)
4. किशोर तुळशीराम मुके (वय 23, रा. मांडवा, ता. गंगापूर)
वाहनाची आणि चौघांची पंचासमक्ष झडती घेतली असता, खालील घातक शस्त्र व साहित्य आढळून आले:
एक देशी बनावटीचा सिल्वर रंगाचा लोखंडी कट्टा
एक मॅगझिनसह कट्टा
एक एअर गन
दोन धारदार सुरे
एक लोखंडी सत्तूर
वरील हत्यारे असलेली हयुंडाई आय-20 कार
एकूण जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे ₹4,54,000/- असून, पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा रजिस्टर नं. 311/2025 प्रमाणे भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3/25, 4/25, मुंबई पोलीस अधिनियम कलम 135, आणि भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 3(5) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
या कारवाईचा पुढील तपास पोउपनि महेश एफ. घुगे हे करत आहेत.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनायकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नापुर्णा सिंग, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सिद्धेश्वर भोरे (उपविभाग - पैठण) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिस स्टेशन बिडकीनचा संपूर्ण पथक विशेष उल्लेखनीय कार्यगिरी बजावल्या बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.