दिव्यांग महिलेच्या उपजीविकेवर बुलडोझर! बच्चू कडू संतापले; अधिकाऱ्यांना फोनवर सुनावलं
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ४ :- शहरातील गजानन मंदिर परिसरात महानगरपालिकेच्या अतिक्रमण कारवाईदरम्यान एक संतापजनक प्रकार घडला आहे. अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांनी अर्चना पारखे या दिव्यांग महिलेच्या मातीच्या भांड्यांची तोडफोड केल्याचा व्हिडियो सोशल मिडीया वर वायरल झाला. या घटनेमुळे परिसरात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
ही बाब समजताच आमदार बच्चू कडू यांनी तात्काळ दखल घेतली. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पाठवत अर्चना पारखे यांची भेट घेतली. तसेच संबंधित अधिकाऱ्याशी फोनवरून संपर्क साधून त्यांना चांगलंच सुनावलं.
दिव्यांग व्यक्तीच्या उपजीविकेवर घाला घालणं कोणत्याही परिस्थितीत सहन केलं जाणार नाही, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला. अर्चना पारखे यांच्या व्यवसायासाठी तातडीने पर्यायी व्यवस्था करावी, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना दिले.
या घटनेमुळे महानगरपालिकेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने वागण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
👉 “दिव्यांगांच्या हक्कांवर घाला की कारवाईच्या नावाखाली अन्याय?” — हा सवाल आता सर्वसामान्यांच्या मनात घुमू लागलाय.