दिवसाढवळ्या घरफोडी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद! छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २८ :- शहरात दिवसाढवळ्या घरफोडी करून दहशत निर्माण करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
वेदांतनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक 42/2026 अंतर्गत, 19 मार्च 2026 रोजी इंद्रनिल अपार्टमेंट येथे घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा तपास सुरू होता. फिर्यादी स्वप्निल बाळासाहेब दरगुडे यांच्या फ्लॅटचे लॉक तोडून चोरट्यांनी कपाट व तिजोरी फोडत सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि पासपोर्ट असा एकूण 3.23 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला होता.
या गुन्ह्याचा तपास करताना आरोपी आंतरराज्यीय टोळीतील असल्याची माहिती गुन्हे शाखेला गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषणातून मिळाली. त्यानुसार पथकाला गुजरातमधील सुरत जिल्ह्यात पाठवण्यात आले.
दि. 27 एप्रिल रोजी सुरत येथे छापा टाकून पोलिसांनी
गुरुदास सुरेश कोळी (वय 28) आणि अमोल गोकुळ जाधव (वय 33) या दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे आणून अटक करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, या आरोपींवर यापूर्वी छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक जिल्ह्यात मिळून ३० पेक्षा अधिक घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सध्या न्यायालयाने दोन्ही आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, त्यांच्या चौकशीतून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उप आयुक्त रत्नाकर नवले आणि सहायक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
👉 शहरात दहशत माजवणाऱ्या टोळीचा शेवट जवळ? पुढील चौकशीत अजून मोठे खुलासे होण्याची शक्यता!