दारूच्या नशेत शिवीगाळ अन् रोजचा त्रास... अखेर सख्ख्या मोठ्या भावानेच केला लहान भावाचा खून!
लाकडी दांड्याने डोक्यावर व शरीरावर वार करून संपविले जीवन, आरोपी मोठ्या भावाला अटक
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २७ :- दारू पिऊन आई-वडिलांसह कुटुंबीयांना वारंवार शिवीगाळ करून त्रास देत असल्याच्या कारणावरून सख्ख्या मोठ्या भावानेच लहान भावाची लाकडी दांड्याने मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना खामगाव जळगाव शिवारात उघडकीस आली आहे. श्रीराम कान्हू एरंडे (वय २६) असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणाचा बिडकीन पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावत आरोपी मोठा भाऊ नवनाथ कान्हू एरंडे याला अटक केली आहे.
शेतात आढळला रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह
दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजण्यापूर्वी खामगाव जळगाव शिवारातील गट क्रमांक ७३ मध्ये राहत्या घरासमोरील शेतात एक तरुण मृतावस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच बिडकीन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर.एम. तडवी व पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी पाहणी केली असता मृत तरुणाची ओळख श्रीराम कान्हू एरंडे अशी पटली. त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा आढळून आल्या. मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनच्या मदतीने तसेच पंचांच्या उपस्थितीत घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठविण्यात आला. वैद्यकीय अहवालात अनेक जखमांमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७१७/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
चौकशीत मोठ्या भावाने दिली हत्येची कबुली
गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी मृत श्रीरामचा सख्खा मोठा भाऊ नवनाथ कान्हू एरंडे याच्याकडे संशयाच्या आधारे कसून चौकशी केली. विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने हत्येची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
श्रीराम हा नेहमी दारू पिऊन घरी येत असे. तसेच आपल्याला आणि आई-वडिलांना शिवीगाळ करून त्रास देत असे. या सततच्या त्रासाला आपण कंटाळलो होतो. दि. २४ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० ते १० वाजण्याच्या सुमारास श्रीराम पुन्हा दारू पिऊन घरी आला आणि शिवीगाळ करू लागला. याच रागातून लाकडी दांड्याने त्याच्या डोक्यावर तसेच हात-पायांवर मारहाण करून त्याला ठार मारल्याची कबुली आरोपीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
हत्येसाठी वापरलेला लाकडी दांडा जप्त
पोलिसांनी दि. २६ नोव्हेंबर रोजी आरोपी नवनाथ एरंडे याला अटक केली. त्याला दि. २८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीने गुन्ह्यात वापरलेला लाकडी दांडा पंचांसमक्ष काढून दिल्याने पोलिसांनी तो जप्त केला आहे.
पोलीस पथकाची कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी आणि पैठण उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या तपासात बिडकीन पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक आर.एम. तडवी, पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप धनेधर, अमोल मगर, राजू चव्हाण आणि पोलीस अंमलदार सतीश साळवे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
किरकोळ कौटुंबिक वाद आणि सततच्या त्रासातून संताप अनावर झाल्याने सख्ख्या भावानेच भावाचा जीव घेतल्याची ही घटना परिसरात खळबळ उडवणारी ठरली आहे.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित