विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; चौथा टप्पा यशस्वी

सातव्या वेतन आयोगासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी एकदिवसीय लाक्षणिक संप; १०० टक्के कर्मचारी सहभागी असल्याचा संघटनेचा दावा

विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; चौथा टप्पा यशस्वी
विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; चौथा टप्पा यशस्वी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २६ :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी (२६ नोव्हेंबर) एकदिवसीय लाक्षणिक काम बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात विद्यापीठातील १०० टक्के कर्मचारी सहभागी झाल्याची माहिती शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. कैलास पाथ्रीकर यांनी दिली.

महाराष्ट्रातील सर्व राज्य विद्यापीठांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन टप्प्याटप्प्याने राबविण्यात येत आहे. यापूर्वी द्वारसभा, मोर्चा, धरणे आंदोलन आणि १८ नोव्हेंबर रोजी लेखणीबंद आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर आता आंदोलनाचा चौथा टप्पा म्हणून एकदिवसीय काम बंद संप पुकारण्यात आला आहे.

भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर आंदोलनाला सुरुवात झाली. सातव्या वेतन आयोगासह कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांची पूर्तता व्हावी, यासाठी हा संप करण्यात येत आहे.

आंदोलनादरम्यान विद्यापीठातील सर्व कर्मचारी दिवसभर मुख्य इमारतीसमोरील हिरवळीवर एकत्र बसून कामकाज बंद ठेवणार आहेत. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू असून, एकदिवसीय लाक्षणिक संपाबाबत कुलसचिव डॉ. संजय कवडे यांना निवेदनाद्वारे अधिकृत माहिती देण्यात आली आहे.

प्रलंबित मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भूमिका कर्मचारी संघटनेने घेतली आहे.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित