बिडकीन पोलिसांचा पान मसाल्याच्या तस्करीवर मोठा प्रहार! विनाक्रमांकाच्या किया सेल्टॉसमधून लाखोंचा प्रतिबंधित माल जप्त; दोघांना अटक

११ लाख ५२ हजार ७६४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत; लोहगाव-बिडकीन रोडवरील तोंडोळी गावाजवळ पोलिसांची धडक कारवाई

बिडकीन पोलिसांचा पान मसाल्याच्या तस्करीवर मोठा प्रहार! विनाक्रमांकाच्या किया सेल्टॉसमधून लाखोंचा प्रतिबंधित माल जप्त; दोघांना अटक
बिडकीन पोलिसांचा पान मसाल्याच्या तस्करीवर मोठा प्रहार! विनाक्रमांकाच्या किया सेल्टॉसमधून लाखोंचा प्रतिबंधित माल जप्त; दोघांना अटक

बिडकीन ता. पैठण दि २६ :- महाराष्ट्रात विक्री, साठवणूक आणि वाहतुकीस बंदी असलेल्या पान मसाला व सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध बिडकीन पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. विनाक्रमांकाच्या किया सेल्टॉस कारमधून प्रतिबंधित पान मसाला आणि सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी रंगेहात पकडले. या कारवाईत वाहनासह एकूण ११ लाख ५२ हजार ७६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार २५ नोव्हेंबर रोजी लोहगाव-बिडकीन रोडवरील तोंडोळी गावाजवळ पोलिसांनी सापळा रचला. दुपारी सुमारे १.२० वाजण्याच्या सुमारास पांढऱ्या रंगाची विनाक्रमांकाची किया सेल्टॉस कार येताना दिसताच पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली.

वाहनात सुनील जयराम ढोले (वय ३३, रा. टेंभापुरी, ता. गंगापूर) आणि अलीम अहमद पटेल (वय ३०, रा. जिकठाण, ता. गंगापूर) हे दोघे आढळून आले. पंचांसमक्ष वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विविध कंपन्यांचा पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळला.

विविध कंपन्यांचा प्रतिबंधित माल जप्त

या कारवाईत प्रिमियम राजनिवास पान मसाला, जाफरानी जर्दा, हिरा पान मसाला, रॉयल ७१७ टोबॅको, विमल पान मसाला आणि व्ही-१ बिग सुगंधित तंबाखू असा माल जप्त करण्यात आला. या प्रतिबंधित पदार्थांची किंमत २ लाख २ हजार ७६४ रुपये असून, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या किया सेल्टॉस कारची अंदाजित किंमत ९ लाख ५० हजार रुपये आहे.

अशा प्रकारे वाहनासह एकूण ११ लाख ५२ हजार ७६४ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

अन्न सुरक्षा कायद्यान्वये गुन्हा दाखल

या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत सुरेश अजिंठेकर यांच्या फिर्यादीवरून बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७१६/२०२६ नुसार अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ५९ तसेच भारतीय न्याय संहिता कलम २७५, १२३, २२३ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी आणि पैठण उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू तडवी, पोलीस उपनिरीक्षक संभाजी झिंजुर्डे आणि बिडकीन पोलीस पथकाने केली.

पुरवठादार आणि उत्पादकांचाही शोध सुरू

जप्त करण्यात आलेल्या प्रतिबंधित अन्नपदार्थांचे नमुने अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी विश्लेषणासाठी घेतले आहेत. या मालाचा मूळ पुरवठादार, विक्रेते आणि उत्पादक कोण आहेत, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. तसेच अटक करण्यात आलेल्या आरोपींचा यापूर्वीचा गुन्हेगारी इतिहासही तपासला जात आहे.

प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अशा अवैध व्यवसायात गुंतलेल्यांचे धाबे दणाणले आहेत.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित