‘त्या’ शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करा; आमदार सतीष चव्हाण यांची उपसंचालकांकडे ठाम मागणी

‘त्या’ शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करा; आमदार सतीष चव्हाण यांची उपसंचालकांकडे ठाम मागणी
‘त्या’ शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करा; आमदार सतीष चव्हाण यांची उपसंचालकांकडे ठाम मागणी

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. १७ :- नोव्हेंबर 2005 पूर्वी अंशत: अनुदानित पदावर नियुक्त खाजगी उच्च माध्यमिक, माध्यमिक व प्राथमिक शाळांतील शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी ठाम मागणी आमदार सतीष चव्हाण यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कैलास दातखीळ यांच्याकडे केली.

जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसंदर्भात जुक्टा शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळासह आज विभागीय शिक्षण उपसंचालकांची भेट घेण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाने (याचिका क्र. 2345/2014) 27 फेब्रुवारी 2025 रोजी दिलेल्या निर्णयानुसार, राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी अंशत: अनुदानित पदावर कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी भविष्य निर्वाह निधी योजना लागू करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर विभागातील वेतन अधीक्षक कार्यालयांनी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडून गुगल फॉर्मद्वारे माहिती गोळा करून उपसंचालक कार्यालयाकडे पाठवली आहे. यामध्ये 942 कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक, 3737 माध्यमिक शिक्षक आणि 1127 प्राथमिक शिक्षकांची माहिती समाविष्ट आहे.

मात्र ही माहिती सादर होऊन सहा महिने उलटूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याचे आमदार चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे पात्र शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली.

यावेळी उपसंचालक कैलास दातखीळ यांनी संबंधित सर्व प्रस्तावांची छाननी करून पात्र शिक्षकांची यादी लवकरच जाहीर करण्यात येईल, असे आश्वासन दिले. बैठकीस जुक्टा शिक्षक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आता निर्णयाची प्रतीक्षा संपते का, याकडे हजारो शिक्षकांचे लक्ष लागले आहे!