“टीव्ही सेंटर मैदानावर व्यापारी बांधकामाला मनसेचा कडाडून विरोध; आंदोलनाचा इशारा”

“टीव्ही सेंटर मैदानावर व्यापारी बांधकामाला मनसेचा कडाडून विरोध; आंदोलनाचा इशारा”

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औंगाबाद), दि. २४ :- हडको परिसरातील टीव्ही सेंटर येथील सार्वजनिक मैदानावर सुरू असलेल्या व्यापारी बांधकामाला मनसेने तीव्र विरोध दर्शवला आहे. महानगरपालिकेमार्फत या ठिकाणी दुकाने उभारून व्यावसायिक उपक्रम सुरू करण्याचे काम सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

सदर मैदान हे हडको परिसरातील नागरिकांसाठी एकमेव खेळाचे व सार्वजनिक उपक्रमांचे केंद्र मानले जाते. येथे लहान मुले, युवक तसेच ज्येष्ठ नागरिक दररोज व्यायाम, खेळ आणि विविध सामाजिक कार्यक्रमांसाठी एकत्र येतात. मात्र, याच ठिकाणी व्यापारी बांधकाम सुरू झाल्याने नागरिकांच्या हक्काच्या जागेवर अतिक्रमण होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात सिडको प्रशासक श्री. जगदीश मिनियार यांना निवेदन देत तात्काळ बांधकाम थांबवण्याची मागणी केली आहे. तसेच हे मैदान कायमस्वरूपी सार्वजनिक वापरासाठी राखून ठेवावे आणि कोणताही व्यावसायिक प्रकल्प येथे राबवू नये, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

यावेळी चंदू नवपुते, ज्ञानेश्वर बोर्डे, खलीक जिलानी आदी उपस्थित होते. नागरिकांच्या भावना डावलून काम सुरू ठेवल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

 “मैदान वाचवा, परिसराचा श्वास जपवा” — नागरिकांच्या भावना आता आंदोलनाच्या उंबरठ्यावर!