जिल्हा पोलिसांचा ‘ऑपरेशन ऑल आऊट’चा धडाका! 72 आरोपींवर 73 गुन्हे; 1.17 कोटींचा मुद्देमाल जप्त

वाळू तस्कर, हातभट्टी दारू, बेकायदेशीर मद्यविक्री, जुगार आणि गुटखा माफियांवर एकाच रात्रीत मोठी कारवाई

जिल्हा पोलिसांचा ‘ऑपरेशन ऑल आऊट’चा धडाका! 72 आरोपींवर 73 गुन्हे; 1.17 कोटींचा मुद्देमाल जप्त
जिल्हा पोलिसांचा ‘ऑपरेशन ऑल आऊट’चा धडाका! 72 आरोपींवर 73 गुन्हे; 1.17 कोटींचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ७ :- जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात जिल्हा ग्रामीण पोलिसांनी ‘ऑपरेशन ऑल आऊट’ अंतर्गत मोठी मोहीम राबवत असामाजिक घटकांवर जबरदस्त कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ६ जून रोजी सायंकाळी ६ ते ७ जून पहाटे ६ या १२ तासांच्या कालावधीत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत ७२ आरोपींविरुद्ध ७३ गुन्हे दाखल करण्यात आले असून तब्बल १ कोटी १७ लाख ८४ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी दिला होता. त्यानुसार सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना विशेष कारवाईचे निर्देश देण्यात आले होते.

वाळू तस्करांवर मोठा प्रहार

अवैध वाळू वाहतुकीविरोधात करण्यात आलेल्या कारवाईत ८ गुन्हे दाखल करून ११ आरोपींना जेरबंद करण्यात आले. यावेळी ८ वाहने जप्त करण्यात आली असून एकूण १ कोटी ११ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संबंधित वाहनांचे परवाने निलंबित करण्याचा प्रस्तावही प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे.

हातभट्टी दारू अड्ड्यांवर धाड

जिल्ह्यातील २० ठिकाणी हातभट्टी दारूविरोधात छापे टाकण्यात आले. या कारवाईत २० आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून ५६१८ लिटर हातभट्टी दारूचे रसायन, ४१९ लिटर तयार दारू तसेच संबंधित साहित्य जप्त करून नष्ट करण्यात आले. जप्त मुद्देमालाची किंमत ४.३३ लाख रुपये आहे.

बेकायदेशीर मद्यविक्रीवर कारवाई

देशी व विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्या १८ आरोपींविरुद्ध १८ गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्या ताब्यातून ९२५ मद्याच्या बाटल्या आणि वाहनांसह १.५६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जुगार अड्ड्यांवर छापे

जिल्ह्यातील विविध भागांत जुगार खेळणाऱ्या २१ जणांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत रोख रक्कम व जुगार साहित्य असा १७ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गुटखा वाहतुकीवरही कारवाई

खुलताबाद पोलिसांनी अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनावर छापा टाकून वाहनासह ७० हजार ६०० रुपयांचा गुटखा जप्त केला.

मद्यधुंद वाहनचालकांवर गुन्हे

दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या चालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वये ३ गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली.

अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या देखरेखीखाली पार पडलेल्या या मोहिमेनंतर जिल्ह्यातील अवैध धंदे, गुंडगिरी आणि असामाजिक कृत्यांविरोधात यापुढेही नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन आणि ‘ऑपरेशन ऑल आऊट’ अधिक तीव्रतेने राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

वाचत रहा ‘महाराष्ट्र वाणी’ – आपल्या परिसरातील प्रत्येक मोठी घडामोड सर्वात आधी! 🚨📰