जामगाव जिल्हा परिषद गटात काट्याची टक्कर अनेक दिग्गज नेत्यांचे राजकीय कसब लागणार पणाला

जामगाव जिल्हा परिषद गटात काट्याची टक्कर अनेक दिग्गज नेत्यांचे राजकीय कसब लागणार पणाला

महाराष्ट्र वाणी न्युज 

  गंगापुर दि २७ :- मराठवाड्याच प्रवेशद्वार असलेला गंगापूर तालुक्यातला जामगाव जिल्हा परिषद गट गंगापूर तालुक्यात आणि जिल्ह्यात राजकीय प्रभाव दाखवणारा गट. विधानसभा,गंगापूर सहकारी साखर कारखाना, जिल्हा दूध संघ, जिल्हा बँक आणि खादी ग्रामोद्योग! या मातब्बर संस्थांवर या गटातल्या नेत्यांनी नेतृत्व केलं. गोदावरी बँक वॉटर मुळे ऊस उत्पादन करणारी बागायतदार शेतकऱ्यांची फळी. त्यामुळे तालुक्यातल्या इतर भागाच्या तुलनेत या भागातले शेतकरी आणि राजकीय नेते भक्कम मानले जातात. त्यामुळे या जिल्हा परिषद गटात होणारी निवडणूक ही अत्यंत चुरशीची होणार यात वाद नाही. यापूर्वी या जिल्हा परिषद गटातून रमेश निरफळ,मारुती साळवे, संतोष माने,माणिकराव पंडित, दिलीप निरफळ निवडून आले असून आता होणाऱ्या निवडणुकीतही जबरदस्त चुरस पाहायला मिळणार आहे.

 

उमेदवार कोण? (सर्वसाधारण महिला)

         :- मागील निवडणुकीत कल्याण गायकवाड आणि दिलीप निरफळ यांच्यात अत्यंत टोकाची लढाई झाली. दिलीप निरफळ अवघ्या दोन मताने निवडून आले. आता जामगावं हा गट महिला सर्वसाधारण सुटल्याने शिंदे गटाकडून दिलीप निरफळ यांनी पुन्हा दंड थोपटले असून उमेदवारी मिळवताना त्यांना माजी आमदार पुत्र संतोष माने, विनोद काळे आणि डॉ. भगवान साटाले यांच्याशी संघर्ष करावा लागेल. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडूनही सूर्यकांत गरडपाटील यांनी तयारी केली असून माजी ग्रामपंचायत सदस्य कावेरी गरड पाटील यांच्यासाठी मोर्चे बांधणी सुरू केलीआहे. चळवळीतले कार्यकर्ते,नातेवाईक आणि मोठा मित्रपरिवार या आधारावर त्यांनी जिंकण्याचा दवा केला आहे. काँग्रेस पक्षाकडून कायगाव येथील निजाम फत्तू शेख यांनीही उमेदवारीची मागणी केली आहे. शिवसेना (उबाठा) गटाकडून प्रदीप निरफळ यांनी जोरदार तयारी केली असून तिथे माजी सभापती लक्ष्मण भाऊ सांगळे, पोपट गाडेकर आणि मधुकर चव्हाण यांच्याकडूनही उमेदवारीवर दावा केल्या जाण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाकडून युवा नेते गणेश चव्हाण यांचे नाव आघाडीवर असून भेंडाळ्याचे सरपंच ज्ञानेश्वर आबा सवई यांनीही पक्षाकडे तिकीट मागितले आहे. भारतीय जनता पक्षाकडून पंचायत समितीचे उपसभापती राहिलेले सुमित मुंदडा येथे काय भूमिका घेतात हे मात्र निर्णायक ठरणार आहे. भारतीय जनता पक्षाकडून त्यांना उमेदवारी न मिळाल्यास ते काही वेगळी भूमिका घेऊ शकता का? याबाबतही जोरदार चर्चा सुरू आहे.राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटाकडून पुन्हा कल्याण गायकवाड उमेदवार असतील अशीच शक्यता वर्तवली जात आहे. रामेश्वर (लल्लन) चव्हाण, गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक प्रल्हाद निरफळ, सचिन माने संधी मिळाली तर उमेदवार होऊ शकतात. दादा गटाकडून ऐनवेळी आमदार सतीश चव्हाण यांची बंधू प्रदीप चव्हाण यांचेही नाव पुढे येऊ शकतं.कुठलीही राजकीय राजकीय पार्श्वभूमी नसताना जनसामान्यांच्या प्रश्नाला न्याय देत रस्त्यावर उतरून आंदोलन करणारा चेहरा म्हणून भाऊसाहेब पाटील शेळके यांच्याकडे पाहिलं जातं. प्रहार संघटनेच्या माध्यमातून उमेदवारी दाखल करत लढणार आणि जिंकणार असल्याच त्यांनी सांगितलं.

 कायगांव गण (ओबीसी ):- हा गट ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाल्याने राजू भडांगे, कृष्णा थोरात, नंदकुमार बागल, दत्तू लांडे अशोक थोरात,राधेश्याम कोल्हे, योगेश चव्हाण, रामभाऊ चोरमले बळीराम खताळ ही नाव भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) यांच्याकडून चर्चेत असून एक गठ्ठा मतदान, पक्षनिष्ठा, आर्थिक रसाद या बळावर उमेदवारी खेचून आणण्यात कोण यशस्वी होतं यावर या गणाच गणित अवलंबून असेल.

 जामगाव गण (सर्वसाधारण महिला):-

                   हा गण सर्वसाधारण महिलेसाठी सुटल्याने बाजार समितीचे माजी सभापती विनोद काळे यांच्या पत्नी, डॉ. जगदाळे, माजी उपसभापती पोपट गाडेकर, काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष गोरखनाथ बोडके यांच्या पत्नी या गणातून उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार आहेत. अर्थात उमेदवाराची योग्य निवड झाल्यास जिल्हा परिषद उमेदवारासाठी हीच जमेची बाजू असेल.

      एकूणच गोदावरीचा बॅकवॉटर म्हणून सुप्रसिद्ध असलेला हा निसर्ग संपन्न प्रदेश आजही विकासापासून मात्र कोसो दूर आहे. जायकवाडी प्रकल्पामुळे विस्थापित झाल्याने अनेक गाव आजही मूलभूत सुविधाच्या प्रतीक्षेत असल्याच दिसतं. गावांना जोडणारी जोड रस्ते व्यवस्थित नाही. भेंडाळा सारखा गावात सार्वजनिक स्मशानभूमीची व्यवस्थाच नाही. तर अनेक गावात सार्वजनिक स्मशानभूमीची अत्यंत दुरावस्था झाली आहे. या पंचक्रोशीतील नागरिकांना आरोग्याच्या कुठल्याही सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध नसल्याने गंगापूरच्या आरोग्य केंद्रावर अवलंबून राहावं लागतं. गावात जिल्हा परिषद शाळेसाठी भौतिक सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने शैक्षणिक गुणवत्ता घसरली आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला या अर्थाने गावात आठ आठ दिवस स्वच्छ पाणी ग्रामस्थांना पिण्यासाठी मिळत नाही. उसाची शेती असल्याने असल्याने 'रात्रीची लाईट' ही या भागाची मोठी समस्या आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत उत्तम नैसर्गिक संपदा असतानाही भौतिक सुविधांची मात्र वाणवा आहे. राजकीय नेते आपलं राजकीय कसब वापरून निवडून तर येतात मात्र सर्वसामान्य जनता अजूनही विकासाची वाट पाहत आहे. या निवडणुकीत तरी जनता विकास करणाऱ्यालाच निवडून देणार का? की अर्थकारणाचाच बोलबाला राहणार हे मात्र निवडणुकीनंतरच कळेल.

       तोपर्यंत कमेंट करून तुम्ही आपली मतं व्यक्त करु शकता.

 शब्दांकन - ज्ञानेश्वर वाघचौरे