एमआयएमचे नगरसेवक समीर साजिद बिल्डर यांची मनपात विरोधी पक्षनेतेपदी निवड
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १८ :- महानगरपालिकेत एमआयएम (AIMIM) पक्षाचे नगरसेवक समीर साजिद बिल्डर यांची अधिकृतपणे विरोधी पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली आहे. पक्षातील सर्व नगरसेवकांच्या एकमताने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर ही घोषणा करण्यात आली.
महानगरपालिकेतील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सातत्याने आक्रमक भूमिका घेणारे आणि प्रशासनाला जाब विचारणारे नेतृत्व म्हणून समीर बिल्डर यांची ओळख आहे. त्यांनी याआधीही शहरातील नागरी प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवला आहे.
निवडीनंतर प्रतिक्रिया देताना समीर बिल्डर म्हणाले की, शहरातील पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छता, आरोग्य सुविधा, अतिक्रमण तसेच मूलभूत नागरी प्रश्नांवर विरोधी पक्ष म्हणून ठाम भूमिका घेतली जाईल.
ते पुढे म्हणाले, “महानगरपालिकेतील सामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही संघर्षशील आणि जबाबदार भूमिका निभावणार आहोत. प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयांना विरोध करून जनतेच्या हितासाठी आवाज उठवणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट असेल.”
समीर साजिद बिल्डर यांच्या नेतृत्वामुळे मनपातील विरोधी पक्ष अधिक सक्रिय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शहराच्या प्रश्नांसाठी आता मनपात विरोधी पक्षाचा आवाज अधिक बुलंद होणार!