परभणी महापालिकेत मुस्लिम महापौर होताच राजकीय वादळ! दानवेंचा भाजपाला सवाल – “तुमच्या पक्षातील मुस्लिम नेते तेव्हा कुठे होते?”
महाराष्ट्र वाणी
परभणी महानगरपालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मुस्लिम महापौर निवडून आल्याने राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. महापौरपद मुस्लिम उमेदवाराकडे गेल्यानंतर अनेक विरोधी पक्षांनी ठाकरे गटावर जोरदार टीका सुरू केली आहे.
काहींनी “जनाब सेना” अशी टीका केली, तर काहींनी “हिंदुत्वाचा त्याग केला” असे आरोप करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. मुंबईत मराठीचा आग्रह धरणाऱ्या ठाकरे गटाला परभणीत मुस्लिम महापौर कसा चालतो? असा सवालही उपस्थित करण्यात आला.
दानवेंचा पलटवार : भाजपाला आरसा दाखवला
या टीकेला शिवसेना (UBT) नेत्यांनी तात्काळ प्रत्युत्तर दिले असून शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी भाजपावर जोरदार टोला लगावला आहे.
दानवे म्हणाले,
“परभणीत मुस्लिम महापौर निवडून येताच भाजपच्या अनेक ‘विद्वानांची’ अचानक पोटदुखी सुरू झाली. पण भाजपच्या पक्षात स्वतः अनेक मुस्लिम नेते मोठ्या पदावर होते, तेव्हा ही टीका कुठे गायब होती?”
भाजपमधील मुस्लिम नेत्यांची यादीच मांडली
दानवेंनी भाजपमधील अनेक मुस्लिम नेत्यांची नावे घेत सवाल उपस्थित केला.
भाजपने मंत्री-खासदार केलेली काही नावे :
सिकंदर बख्त
शाहनवाज हुसेन
मुख्तार अब्बास नकवी
नजमा हेपतुल्ला
एम.जे. अकबर
सय्यद झफर इस्लाम
जमाल सिद्दीकी
“तेव्हा भाजपचं हिंदुत्व कुठे गेलं होतं?” असा थेट प्रश्न दानवेंनी उपस्थित केला.
महापौर निवडून आणणारे नगरसेवक हिंदूही आहेत
दानवे पुढे म्हणाले की, महापौर निवडून आणणाऱ्या नगरसेवकांमध्ये हिंदू नगरसेवकही आहेत. तरीही समाजमाध्यमांवरील काही मंडळींना उगाचच पोटशूळ उठला आहे.
इतिहास समजून घेतल्याशिवाय टीका करणाऱ्यांना त्यांनी “काल आलेले” असे म्हणत सुनावले.
महापौर निष्ठावंत शिवसैनिक असल्याचा दावा
दरम्यान, परभणीचे नवनियुक्त महापौर सय्यद इक्बाल हे शिवसेनेचे अनेक वर्षांपासूनचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि तालुका प्रमुख असल्याचे सांगितले जात आहे.
सोशल मीडियावर एक पोस्टही व्हायरल होत असून, खासदार संजय जाधव यांनी शिवपुराण कथेच्या आयोजनासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी इक्बाल यांनी स्वतःच्या शेतावर नांगर फिरवून मदत केली होती, असा उल्लेख करण्यात आला आहे.
राजकीय तापमान वाढले
या निवडीमुळे परभणीतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले असून येत्या काळात हा मुद्दा अधिक चिघळण्याची शक्यता आहे.
👉 राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरूच राहतील, पण परभणीतील हा निर्णय आता राज्याच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरलाय!