सफाई कामगारांच्या ३९ वारसांना अखेर महापालिकेत नोकरी! महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांच्या हस्ते आदेश प्रदान

लाड समितीच्या शिफारशीनुसार नियुक्ती आदेशांचे वितरण;

सफाई कामगारांच्या ३९ वारसांना अखेर महापालिकेत नोकरी! महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांच्या हस्ते आदेश प्रदान
सफाई कामगारांच्या ३९ वारसांना अखेर महापालिकेत नोकरी! महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांच्या हस्ते आदेश प्रदान

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ४ :- छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी देण्याचा प्रश्न मार्गी लागला असून, लाड समितीच्या शिफारशीनुसार ३९ पात्र वारसांना नियुक्ती आदेश देण्यात आले. बुधवार, ४ नोव्हेंबर रोजी प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे सभागृहात सर्वसाधारण सभेच्या मध्यंतरात हा कार्यक्रम पार पडला.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या २४ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार सफाई कामगारांच्या सेवानिवृत्ती, स्वेच्छा सेवानिवृत्ती, रुग्णता सेवानिवृत्ती तसेच मृत्यूनंतर त्यांच्या पात्र वारसांना लाड समितीच्या शिफारशीनुसार नियुक्ती देण्याची तरतूद आहे.

या तरतुदीनुसार महापालिकेकडे प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करण्यात आली. पात्र उमेदवारांचे प्रस्ताव निवड समितीसमोर ठेवण्यात आले होते. ३ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या निवड समितीच्या बैठकीत ३९ सफाई कामगारांच्या पात्र वारसांना नियुक्ती देण्याची शिफारस करण्यात आली होती.

त्यानुसार बुधवारी महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, विरोधी पक्षनेते अब्दुल समीर साजिद, इतर पदाधिकारी व सदस्य तसेच महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या हस्ते ३९ वारसांना नियुक्ती आदेश वितरित करण्यात आले.

या नियुक्त्यांमुळे सफाई कामगारांच्या कुटुंबीयांना रोजगाराचा आधार मिळाला असून, अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या नियुक्ती प्रक्रियेला पूर्णविराम मिळाला आहे.