“खरीपपूर्व तयारीला वेग; सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांचा अधिकाऱ्यांना कडक इशारा”
महाराष्ट्र वाणी
सिल्लोड, दि. २४ :— सिल्लोड नगर परिषदेच्या सभागृहात आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम पूर्व तालुकास्तरीय नियोजन व आढावा बैठक पार पडली. या बैठकीत कृषी विभागासह संबंधित यंत्रणांना महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.
अधिकाऱ्यांना संबोधित करताना सत्तार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, शेतकऱ्यांसाठी प्रमाणित बियाणे व खतांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा. खरीप हंगामात बियाणे व खतांची कोणतीही टंचाई निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच, चढ्या दराने खत व बियाण्यांची विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर आणि बोगस साहित्य विकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी स्वतंत्र टास्क फोर्स तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यासोबतच, पात्र शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज मिळावे आणि त्यांची कोणतीही अडवणूक किंवा पिळवणूक होणार नाही, यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष देण्याचे आदेशही त्यांनी दिले.
या बैठकीस नगराध्यक्ष अब्दुल समीर, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, तहसीलदार अंकिता ताकभाते, उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, मुख्याधिकारी कारभारी दिवेकर, पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
👉 “शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रशासन सज्ज; आता खरीप हंगामाकडे सर्वांचे लक्ष!”