कर्जमाफीसाठी ‘एल्गार अन्नदात्याचा’; रोहित पवारांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाची जोरदार तयारी सुरू
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. २५ :- दि. २९ जून २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आमदार रोहितदादांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या ‘एल्गार अन्नदात्याचा’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात दिनांक 25 जुन रोजी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत आंदोलनाच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीला पक्षाने नियुक्त केलेले पदाधिकारी महेश तपासे, सुनील माने आणि रविकांत वरपे उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून आंदोलनात किती शेतकरी सहभागी होणार आहेत, याचा आढावा घेण्यात आला. तसेच आंदोलनाची भूमिका, उद्दिष्टे आणि आगामी दिशा यावर सखोल चर्चा करण्यात आली.
राज्यातील शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात संघटितपणे लढा उभारण्याबाबत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये विचारविनिमय झाला. यावेळी आंदोलन राज्यातील एक भव्य जनआंदोलन ठरणार असून त्याचा आवाज थेट मंत्रालयापर्यंत पोहोचेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. तसेच सरकारला संपूर्ण कर्जमाफी करण्यास भाग पाडण्यासाठी हे आंदोलन निर्णायक ठरणार असल्याचेही मत उपस्थितांनी मांडले.
या बैठकीस पक्षाचे निरीक्षक माजी आमदार चंद्रकांत दानवे माजी आमदार संजय वाघचौरे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, कार्याध्यक्ष विश्वजीत चव्हाण, शहराध्यक्ष खाजा शरफोद्दीन, शेख शफीक, छायाताई जंगले, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष रज्जाकभाई, लाईकभाई, जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, विविध सेलचे अध्यक्ष, युवक अध्यक्ष अतुल गावंडे, सलीमभाई, ज्येष्ठ नागरिक सेलचे जिल्हाअध्यक्ष अखलाख देशमुख, किसान सेलचे हरिदास शेलार तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
"२९ जूनच्या एल्गारची तयारी अंतिम टप्प्यात; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आता राज्यभरातून आवाज बुलंद होणार," अशी भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली.
“आता २९ जूनच्या ‘एल्गार अन्नदात्याचा’ आंदोलनाकडे राज्यातील शेतकरी आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.”