आठ शासकीय मुद्रणालयांचा इशारा; प्रलंबित मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन आणि २५ फेब्रुवारीला लाक्षणिक संपाची हाक

आठ शासकीय मुद्रणालयांचा इशारा; प्रलंबित मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन आणि २५ फेब्रुवारीला लाक्षणिक संपाची हाक
आठ शासकीय मुद्रणालयांचा इशारा; प्रलंबित मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन आणि २५ फेब्रुवारीला लाक्षणिक संपाची हाक

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २२ :- कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील आठ शासकीय मुद्रणालये तसेच शासकीय लेखन सामग्री व ग्रंथागारातील कर्मचारी आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत.

आकृतीबंध मंजुरी, सेवा प्रवेश नियमांची अंमलबजावणी, रिक्त पदे तात्काळ भरणे, अनुभवाच्या निकषावर पदोन्नती, मुद्रण विभागाला दुसरा व चौथा शनिवार सुट्टी, विशेष मुद्रण भत्ता, तसेच व्यवस्थापकीय व पर्यवेक्षक पदे भरण्याच्या प्रमुख मागण्या अद्याप प्रलंबित असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने या मागण्यांची दखल घ्यावी, यासाठी गव्हर्नमेंट प्रेसेज एम्प्लॉईज फेडरेशन, मुंबई यांच्या आदेशानुसार २०, २१, २३ आणि २४ फेब्रुवारी २०२६ रोजी दररोज सकाळी दोन तासांचे ठिय्या आंदोलन व उग्र निदर्शने करण्यात येणार आहेत.

जर शासनाने याची दखल घेतली नाही, तर २५ फेब्रुवारी २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील मुद्रणालये व लेखन सामग्री व ग्रंथागारातील कर्मचारी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

या आंदोलनाबाबत माहिती देण्यासाठी शासकीय मुद्रणालय कर्मचारी संघटना, छत्रपती संभाजीनगर यांनी १८ फेब्रुवारी रोजी द्वारसभा घेतली. या सभेला अध्यक्ष शिवनाथ ठोंबरे, सरचिटणीस देवानंद लांडगे, महासंघाचे उपाध्यक्ष यशवंत गावडे, कार्याध्यक्ष संदीप वाघमारे, तसेच इतर पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संघटनेने स्पष्ट इशारा दिला आहे की, शासनाने तातडीने निर्णय घेतला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.

👉 आता शासन भूमिका बदलणार की संघर्ष अधिक तीव्र होणार? राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांचे लक्ष या निर्णयाकडे लागले आहे!