दुष्काळात शेतकऱ्यांकडून मायक्रो फायनान्सची सक्तीची वसुली बंद; जिल्हाधिकारी विनय गौडांचे जी सी यांचे कडक आदेश
शेतकऱ्यांनो, मायक्रो फायनान्सच्या वसुलीच्या तगाद्याला घाबरू नका! सक्तीची वसुली केल्यास थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करा;
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि. ३ :- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची दिलासादायक बातमी समोर आली आहे. मायक्रो फायनान्स कंपन्या आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्थांनी शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची सक्तीची कर्जवसुली करू नये, असे स्पष्ट आणि कडक निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणींचा विचार करून शासनाच्या निर्देशांचे पालन करावे, असेही त्यांनी बजावले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (दि. ३) जिल्ह्यातील सर्व मायक्रो फायनान्स कंपन्यांचे संचालक तसेच बिगर बँकिंग वित्तीय संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकारी गौडा यांनी वसुलीच्या नावाखाली शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना त्रास देऊ नये, अशा स्पष्ट सूचना दिल्या.
दुष्काळात शेतकऱ्यांवर वसुलीचा तगादा नको!
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिक आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. अशा कठीण काळात कर्ज किंवा अन्य आर्थिक व्यवहारांच्या वसुलीसाठी शेतकऱ्यांवर दबाव आणणे अथवा सक्ती करणे योग्य नाही. यासंदर्भात रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनाही आहेत. त्यामुळे संबंधित वित्तीय संस्थांनी या सूचनांचे पालन करावे, असे जिल्हाधिकारी गौडा यांनी स्पष्ट केले.
तसेच मायक्रो फायनान्स कंपन्यांना अन्य व्यावसायिक कारणांसाठी गावांमध्ये जायचे असल्यास संबंधित गावचे सरपंच, पोलीस पाटील आणि ग्राम महसूल अधिकारी यांना पूर्वसूचना देऊनच जावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
सक्तीची वसुली झाली तर थेट येथे करा तक्रार!
मायक्रो फायनान्स कंपनी किंवा कोणतीही वित्तीय संस्था कर्जवसुलीसाठी तगादा लावत असेल, दबाव टाकत असेल किंवा सक्तीचा अवलंब करीत असेल, तर शेतकरी आणि ग्रामस्थांनी गप्प न बसता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.
तक्रारीसाठी महत्त्वाचे संपर्क क्रमांक :
- जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष : ०२४०-२३३१०७७
- टोल फ्री क्रमांक : १८०० १०२ १०८०
या बैठकीला अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था समृत जाधव, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रेषित मोघे तसेच विविध वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
दुष्काळाने आधीच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना कर्जवसुलीच्या नावाखाली त्यांना आणखी त्रास दिला जाऊ नये, ही प्रशासनाची भूमिका या निर्णयातून स्पष्ट झाली आहे. त्यामुळे सक्तीच्या वसुलीला बळी न पडता अन्याय झाल्यास तातडीने तक्रार करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित