आता खासगी आस्थापनांवर पोलिसांची नजर! ५० मीटर परिसरातील CCTV कव्हरेज बंधनकारक; नियम मोडल्यास थेट गुन्हा दाखल होणार!
पोलीस आयुक्त प्रविण पवार यांचा मोठा आदेश
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ६ :- शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी आणि गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रविण पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. शहरातील खासगी आस्थापनांना आता त्यांच्या परिसरात उच्च दर्जाची CCTV यंत्रणा बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, संबंधित आस्थापनांच्या सीमारेषेपासून तब्बल ५० मीटरपर्यंतचा परिसर CCTV कॅमेऱ्यांच्या कक्षेत येणे आवश्यक असणार आहे.
पोलीस आयुक्तांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये ४ नोव्हेंबर २०२६ रोजी यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. हा आदेश ६ नोव्हेंबर २०२६ पासून ४ जानेवारी २०२७ पर्यंत म्हणजेच ६० दिवस लागू राहणार आहे.
२३ प्रकारच्या आस्थापनांना आदेश लागू
या आदेशाच्या कक्षेत बँका, एटीएम, वित्तीय संस्था, दागिन्यांची दुकाने, हॉटेल्स, गेस्ट हाऊस, रेस्टॉरंट्स, बार-पब, वाईन व बिअर दुकाने, निवासी टॉवर्स, कार्यालयीन इमारती, पेट्रोल पंप, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल्स, सुपर मार्केट्स, जिम, क्रीडा संकुले, चित्रपटगृहे, शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळे, रुग्णालये तसेच पुतळ्यांच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या ट्रस्ट व संस्थांचा समावेश आहे. नवीन बांधकाम सुरू असलेल्या निवासी व कार्यालयीन इमारतींनाही हा आदेश लागू राहणार आहे.
CCTV बाबत पाच महत्त्वाच्या अटी
पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार संबंधित आस्थापनांना पुढील नियमांचे पालन करावे लागणार आहे.
1. आस्थापनाच्या सीमारेषेपासून ५० मीटरपर्यंतचा परिसर रेकॉर्ड होईल अशा पद्धतीने CCTV कॅमेरे बसवावे लागतील.
2. CCTV यंत्रणा चोवीस तास कार्यरत ठेवणे बंधनकारक असेल.
3. किमान १५ दिवसांचे रेकॉर्डिंग साठविण्याची क्षमता असलेली दर्जेदार यंत्रणा बसवावी लागेल.
4. पोलिसांनी मागणी केल्यास संबंधित CCTV फुटेज उपलब्ध करून द्यावे लागेल.
5. CCTV मध्ये कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा कृती आढळल्यास जवळच्या पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना तात्काळ माहिती द्यावी लागेल.
नियम मोडल्यास भारतीय न्याय संहिता कलम २२३ नुसार कारवाई!
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित व्यक्ती किंवा आस्थापनांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.
गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिसांचा पुढाकार
शहरातील सार्वजनिक ठिकाणांसह खासगी आस्थापनांच्या परिसरातही अनेक गुन्हे घडतात. मात्र, CCTV कॅमेरे नसणे, कॅमेऱ्यांची दिशा योग्य नसणे, अपुरे रेकॉर्डिंग किंवा निकृष्ट दर्जाची यंत्रणा यामुळे तपासासाठी आवश्यक पुरावे मिळण्यात अडचणी येतात. अनेकदा आस्थापनाबाहेर घडलेल्या घटनांचे चित्रीकरण उपलब्ध होत नसल्याने गुन्ह्यांचा उलगडा करणे कठीण होते.
ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. CCTV यंत्रणेमुळे गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, संशयास्पद घटनांची नोंद करणे आणि गुन्ह्यांच्या तपासासाठी वैज्ञानिक पुरावे मिळविणे शक्य होणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
एकूणच, आता छत्रपती संभाजीनगर शहरातील खासगी आस्थापनांना केवळ स्वतःच्या सुरक्षेसाठीच नव्हे, तर परिसरातील सुरक्षेच्या दृष्टीनेही CCTV यंत्रणा सक्षम ठेवावी लागणार आहे. पोलीस आयुक्तांच्या या आदेशामुळे शहरातील CCTV सुरक्षेचे जाळे अधिक मजबूत होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महाराष्ट्र वाणी न्यूज | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित