दिवाळीनंतर एसटीची तुफान कमाई! चार दिवसांत ९ कोटींचे घसघशीत उत्पन्न; पुणे-नाशिक मार्गावर प्रवाशांची सर्वाधिक गर्दी!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १६ :- दिवाळीच्या सुट्ट्या संपताच गावी आलेल्या चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून, एसटी महामंडळाच्या बसेसना प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मध्यवर्ती बसस्थानकासह शहरातील बसस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. विशेषतः पुणे आणि नाशिक मार्गावर प्रवाशांची संख्या अधिक असल्याने एसटी महामंडळाकडून जादा बसेस सोडण्यात येत आहेत.
दिवाळीनंतरच्या या गर्दीच्या हंगामात छत्रपती संभाजीनगर एसटी विभागाने उत्पन्नाच्या बाबतीतही मोठी झेप घेतली आहे. ११ ते १४ नोव्हेंबर या अवघ्या चार दिवसांत एसटी विभागाच्या बसेसनी तब्बल ९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.
या चार दिवसांच्या कालावधीत विभागाच्या ५३३ बसेस प्रवासी सेवेत रस्त्यावर धावल्या. या बसेसनी मिळून तब्बल ८ लाख ६० हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. प्रवाशांची वाढती संख्या आणि एसटीवरील विश्वास यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे.
प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी बसस्थानकांवर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. गर्दीचे नियोजन, बसेसचे वेळापत्रक आणि जादा फेऱ्यांचे नियोजन यावर विशेष लक्ष दिले जात आहे. त्याचबरोबर सुरक्षित प्रवासासाठी चालक आणि वाहकांनाही आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
एकीकडे दिवाळीनंतर प्रवाशांची परतीसाठी लगबग, तर दुसरीकडे एसटीच्या तिजोरीत चार दिवसांत ९ कोटींची भर! प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता एसटी महामंडळासाठी दिवाळीनंतरचा हा हंगाम चांगलाच फायदेशीर ठरत असल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्र वाणी न्यूज | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित