MIDC वाळुजमध्ये मोठी कारवाई: इंड्युरन्स कंपनीतील चोरी प्रकरण उघड – ४.६८ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २० :– MIDC वाळुज पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने इंड्युरन्स कंपनीतील चोरी प्रकरणाचा यशस्वी छडा लावत तब्बल ४ लाख ६८ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून तिघा आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई मा. पोलीस उपआयुक्त पंकज अतुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या प्रकरणात गुरनं. 1298/2025 अंतर्गत भा. न्याय संहिता कलम 316(3), 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींनी इंड्युरन्स कंपनीतील मालाची वाहतूक करताना संगनमत करून काही माल लंपास करून स्वतःच्या फायद्यासाठी विक्री केल्याचे उघड झाले आहे.
पोलिसांनी आरोपींकडून सिल्वर रंगाच्या Aluminium Ingot धातूच्या 45 लादी (एकूण 450 किलो) जप्त केल्या असून त्याची किंमत 1,68,750 रुपये आहे. याशिवाय इतर 3 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून एकूण मुद्देमाल 4,68,750 रुपयांचा आहे.
या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत –
संदिप रमेश दाणे (वय 32, सिडको महानगर)
निलेश संजय पवार (वय 21, साजापूर)
राजु सलाउद्दीन शेख (वय 22, पंढरपूर)
तक्रारदार योगेश साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 18 डिसेंबर 2025 रोजी कंपनीचा माल बोलेरो वाहनातून कृष्णा कोटींग कंपनीकडे पाठवण्यात आला होता. मात्र आरोपींनी अर्धा माल पोहोचवून उर्वरित माल चोरी करून विकल्याचे समोर आले.
तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींपर्यंत पोहोचत त्यांना अटक केली. आरोपींनी चोरीचा माल वितळवून त्याचे गड्डे तयार करून विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई मा. पोलीस आयुक्त प्रविण पवार, सहा. पोलीस आयुक्त डॉ. भागीरथी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे व त्यांच्या पथकाने पार पाडली.
सदर गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास पोउपनि विनोद अबुज करत आहेत.
👉 गुन्हेगार कितीही शक्कल लढवो, कायद्याच्या हातातून सुटका नाही — पोलिसांची पुन्हा एकदा प्रभावी कारवाई!