'6 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा धोका; मुख्यमंत्र्यांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा'

'6 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा धोका; मुख्यमंत्र्यांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा'

महाराष्ट्र वाणी 

मुंबई दि ४ :- राज्यात सध्या पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक भागांत मुसळधार सरी कोसळत आहेत. बदलत्या हवामान परिस्थितीमुळे प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. हवामान विभागाकडूनही वेळोवेळी इशारे आणि मार्गदर्शक सूचना जारी केल्या जात आहेत.

याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांसाठी महत्त्वाचा इशारा दिला आहे. त्यांनी येत्या 6 जुलैपर्यंत राज्यातील काही भागांत अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करत नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानंतर मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरातील प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून अनेक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरही परिणाम जाणवत असून मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) अनेक भागांमध्ये वाहतुकीचा वेग मंदावल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय सहकार दिनाच्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिली. राज्यातील काही ठिकाणी अतिवृष्टीसह जोरदार वाऱ्यांचाही धोका असल्याचे त्यांनी सांगितले.

परिस्थितीवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून दर तीन तासांनी हवामानाचा आढावा घेऊन आवश्यक सूचना आणि अलर्ट जारी केले जात आहेत. नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

पावसाचा वाढता जोर लक्षात घेता पुढील अपडेट्ससाठी ‘महाराष्ट्र वाणी’सोबत जोडलेले रहा!