२५ वर्षांपासून गरजू विद्यार्थ्यांसाठी जळगावच्या ४० महिला देताहेत मोफत भाजी; माणुसकीचा अनोखा आदर्श
महाराष्ट्र वाणी
जळगाव दि १५ :- स्वतःच्या कष्टावर संसाराचा गाडा चालवतानाच गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढे येणाऱ्या जळगावमधील भाजी विक्रेत्या महिलांनी माणुसकीचा अनोखा आदर्श निर्माण केला आहे. गेल्या तब्बल २५ वर्षांपासून या महिला आठवड्यातील तीन दिवस गरजू विद्यार्थ्यांना मोफत भाजी उपलब्ध करून देत आहेत.
या सेवाभावी उपक्रमाची सुरुवात सन २००० मध्ये झाली. त्यावेळी ‘स्टुडंट्स एड कमिटी’च्या माध्यमातून केवळ पाच विद्यार्थ्यांना मदत केली जात होती. दोन महिलांनी पुढाकार घेत, आपल्या परीने गरजू विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला आणि मोफत भाजी देण्यास सुरुवात केली.
सुरुवातीच्या काळात स्थानिक व्यापाऱ्यांकडून तेल, पीठ, धान्य यांसारख्या जीवनावश्यक वस्तू मदतीच्या स्वरूपात मिळत होत्या. मात्र विद्यार्थ्यांसाठी ताज्या भाज्यांचीही गरज होती. ही बाब लक्षात घेऊन डॉ. सुभाष राणे यांनी बाजारातील भाजी विक्रेत्यांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.
यानंतर दिवंगत मंगला ताई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला. विद्यार्थ्यांना आठवड्यातून सोमवार, बुधवार आणि शनिवार या तीन दिवशी बाजारातून मोफत भाजी देण्याची परंपरा सुरू झाली. काळ बदलला, परिस्थिती बदलली; मात्र या महिलांची सेवाभावाची भावना कायम राहिली.
आज या उपक्रमाशी ४० हून अधिक महिला जोडल्या गेल्या आहेत. ठरलेल्या दिवशी विद्यार्थी रिकाम्या गोण्या घेऊन बाजारात येतात. काही वेळातच या गोण्या विविध ताज्या भाज्यांनी भरून जातात. कोणताही गाजावाजा न करता या महिला आपल्या कष्टाच्या कमाईतून विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत आहेत.
विशेष म्हणजे, या महिला पहाटेपासून बाजारात व्यवसायासाठी मेहनत करतात. स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतानाही गरजू विद्यार्थ्यांसाठी काही हिस्सा देण्याची त्यांची परंपरा गेल्या २५ वर्षांपासून अखंड सुरू आहे.
या उपक्रमातून अनेक विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळत असून, ‘आपल्याकडे जे आहे त्यातील थोडे दुसऱ्यांसाठी देणे’ हा माणुसकीचा संदेशही समाजापर्यंत पोहोचत आहे.
पैसा कमी-जास्त असू शकतो; पण मदतीची भावना मोठी असेल तर त्यातूनही समाजासाठी मोठं काम उभं राहू शकतं, हे जळगावच्या या महिलांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे.
“दान करण्यासाठी श्रीमंत असण्याची गरज नसते; गरज असते ती मोठ्या मनाची.”
जळगावच्या या ४० हून अधिक महिलांच्या २५ वर्षांच्या सेवाभावी परंपरेला खरोखरच सलाम!