हल्द्वानी घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसचा भव्य मोर्चा; संविधानिक मूल्यांच्या रक्षणाचा निर्धार
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १४ :- उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे काँग्रेसच्या कार्यक्रमस्थळी गंगाजलाने कथित ‘शुद्धीकरण’ करण्यात आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य मोर्चा व सत्याग्रह करण्यात आला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आयोजित या आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
गांधी भवन येथून सुरू झालेला मोर्चा शहागंज येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आला. जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर आणि शहर जिल्हाध्यक्ष ॲड. सय्यद अक्रम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी हल्द्वानी घटनेचा तीव्र निषेध नोंदवत सामाजिक समता आणि संविधानिक मूल्यांच्या रक्षणाचा संदेश दिला.
हल्द्वानी येथे काँग्रेस अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमस्थळ ‘अपवित्र’ झाल्याचा दावा करत गंगाजलाने शुद्धीकरण करण्यात आल्याची घटना समोर आली होती. या कृतीचा काँग्रेसने निषेध केला. ही घटना केवळ काँग्रेस अध्यक्षांचा अपमान नसून सामाजिक समता, बंधुता, सामाजिक न्याय, मानवी प्रतिष्ठा आणि भारतीय संविधानाच्या मूलभूत मूल्यांवर आघात असल्याची भूमिका काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
भारताच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे जात, धर्म किंवा सामाजिक पार्श्वभूमीच्या आधारावर कोणत्याही व्यक्तीशी भेदभाव करणे हे संविधानाच्या मूलभूत भावनेच्या विरोधात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
मोर्चादरम्यान कार्यकर्त्यांनी “संविधान जिंदाबाद”, “सामाजिक समतेचा विजय असो”, “भेदभावाचा निषेध असो” तसेच “मल्लिकार्जुन खरगेजी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं” अशा घोषणा देत वातावरण दणाणून सोडले.
शहागंज येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ मोर्चाची सांगता सत्याग्रहाने करण्यात आली. यावेळी महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करून सामाजिक समता, बंधुता, न्याय आणि संविधानिक मूल्यांचे रक्षण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, हल्द्वानी घटनेचा निषेध हा केवळ राजकीय आंदोलन नसून सामाजिक समता आणि संविधानिक मूल्यांच्या संरक्षणासाठीचा आवाज आहे. देशात कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला थारा न देता संविधानाने दिलेली समानता, बंधुता आणि मानवी प्रतिष्ठेची मूल्ये अबाधित ठेवण्यासाठी काँग्रेस सातत्याने संघर्ष करणार आहे.
या आंदोलनात ॲड. संदीप पाटील, राजेश मुंढे, इब्राहिम पठाण, शेख युसूफ, ॲड. इकबालसिंग गिल, जगन्नाथ काळे, भाऊसाहेब जगताप, दिपालीताई मिसाळ, ऋषिकेश महाजन, इंजि. विशाल बन्सवाल, शेख अथर, दुर्गेश वैद्य, जयप्रकाश नारनवरे, मोईन कुरेशी, आबेद कादरी, दीक्षा पवार, अनिता भंडारी, शीला मगरे, उषा खंडाळे, जोसफिन फ्रान्सिस, शौकत बानो, मंजू लोखंडे, साहेबराव बनकर, अय्युब खान, अफजल खान, महेंद्र रमंडवाल, चंद्रकांत बनसोडे, मुझफ्फर खान, मोहम्मद जाकेर, अकिल पटेल, सुरेश पवार, राहुल सावंत, रामभाऊ लोखंडे, रमाकांत गायकवाड, सुमेध नरनावरे, उमाकांत खोतकर, अतिश पितळे, संजय धर्मरक्षक, सय्यद जाकीर, अस्मत खान, हकीम पटेल, योगेश थोरात, शेख अब्दुल रईस, उत्तम दणके, अरुण शिरसाट, अदनान किरमानी, कल्याण चव्हाण, इरफान पठाण, मुसा पटेल, सलीम इनामदार, जयपाल दवणे, अफसर शेख, गणेश जाधव, मोईन इनामदार, अनिस पटेल, नारायण पारटकर, नदीम सौदागर, मुनीर पटेल, बाबुराव कवसकर, सलीम पटेल, किशोर चावरिया, दिलीप भोसले, अकिफ रजवी, सलीम खान, सय्यद फैयाजुद्दीन, शिरीष चव्हाण, शेख फैज, रवी लोखंडे, शेख इम्रान यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.