"सोनम वांगचुक यांच्या लढ्याला प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा; केंद्र सरकारवर साधला थेट निशाणा"
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर / नवी दिल्ली दि १६ :- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण सुधारक आणि हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. सोनम वांगचुक हे सध्या आपल्या विविध मागण्यांसाठी अनिश्चितकालीन उपोषणाच्या 19व्या दिवशी आहेत.
यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका करत, "सरकारने सोनम वांगचुक यांच्याशी तातडीने चर्चा सुरू करावी. संवाद साधणे ही सरकारची कृपा नसून ती घटनात्मक आणि नैतिक जबाबदारी आहे," असे स्पष्टपणे सांगितले.
आंबेडकर म्हणाले की, देश-विदेशात नवोन्मेषक, शिक्षण सुधारक आणि पर्यावरण कार्यकर्ते म्हणून गौरवलेल्या व्यक्तीचे म्हणणे ऐकण्यास सरकार तयार नसल्यास, तो भारतीय लोकशाहीसाठी गंभीर चिंतेचा विषय आहे.
याचवेळी त्यांनी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. "राहुल गांधी यांनी सोनम वांगचुक यांच्या समर्थनासाठी येथे उपस्थित राहायला हवे होते. मी स्वतः येथे आलो, अरविंद केजरीवाल, संजय सिंग, खासदार चंद्रशेखर आझाद, खा. डिंपल यादव आणि अनेक पक्षाचे नेते येथे आले, मग विरोधी पक्षनेते म्हणून त्यांचीही ही नैतिक जबाबदारी होती," असे आंबेडकर म्हणाले.
NEET पेपर लीक प्रकरणाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, ज्या प्रकारे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना या प्रकरणात जबाबदार धरले जात आहे, त्याचप्रमाणे विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांनीही सरकारविरोधात लढणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्या या भूमिकेमुळे सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला नवे राजकीय बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.