सिल्लोड महसूल प्रशासनाची धडक कारवाई! केऱ्हाळा फाट्यावर अवैध गौण खनिज वाहतूक करणारा हायवा जप्त

सिल्लोड महसूल प्रशासनाची धडक कारवाई! केऱ्हाळा फाट्यावर अवैध गौण खनिज वाहतूक करणारा हायवा जप्त

सिल्लोड दि १९ :- तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. केऱ्हाळा फाटा येथे करण्यात आलेल्या कारवाईत आवश्यक कागदपत्रे आणि वाहतूक परवाना नसलेला हायवा ट्रक महसूल पथकाने ताब्यात घेतला. पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी हे वाहन सिल्लोड तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे.

सिल्लोड तालुक्यात गौण खनिजाच्या अवैध उत्खननासह बेकायदेशीर वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर महसूल पथकाने केऱ्हाळा फाटा येथे तपासणी मोहीम राबवली. यावेळी संशयित हायवा ट्रक अडवून त्याची तपासणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान संबंधित वाहनाकडे आवश्यक कागदपत्रे आणि गौण खनिज वाहतुकीचा परवाना आढळून न आल्याने महसूल प्रशासनाने वाहन ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी हायवा सिल्लोड तहसील कार्यालयात जमा करण्यात आला.

तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

सिल्लोडचे तहसीलदार सागर वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी मंडळ अधिकारी काशिनाथ ताठे यांच्यासह केऱ्हाळा येथील ग्राम महसूल अधिकारी मुक्तार शहा, आमठाणा येथील विशाल दूनगहू, घाटनांद्रा येथील गणराज पल्लवे, निल्लोड येथील वाल्मिक सुरडकर, पिंप्री येथील दीपक बागुल आणि बोरगाव कासारी येथील राजू बनसोड यांच्यासह महसूल कर्मचारी उपस्थित होते.

अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांना इशारा

सिल्लोड तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा महसूल प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे गौण खनिजाची वाहतूक करताना आवश्यक कागदपत्रे आणि परवाने जवळ ठेवण्याचे महत्त्व या कारवाईतून अधोरेखित झाले आहे.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित