समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : फॉर्च्यूनर कंटेनरवर आदळली; डॉक्टर दाम्पत्याचा मृत्यू, तीन जखमी
महाराष्ट्र वाणी
सिंदखेड राजा दि २३ :- समृद्धी महामार्गावर मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात डॉक्टर दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला, तर दोन मुले आणि चालक गंभीर जखमी झाले. हा अपघात सिंदखेड राजा तालुक्यातील मुंबई कॉरिडॉरवरील चॅनल क्रमांक 326 जवळ किनगाव राजा परिसरात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी फॉर्च्यूनर (एमएच 20 एचएन 6768) डॉ. सय्यद आसिफ सय्यद उमर आपल्या कुटुंबासह प्रवास करत होते. त्याचवेळी लोखंडी सळ्या भरलेला कंटेनर (एनएल 01 एडी 4981) मुंबईच्या दिशेने जात होता. भरधाव वेगातील फॉर्च्यूनरने कंटेनरला मागून जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की फॉर्च्यूनर वाहन थेट कंटेनरच्या मागील चाकांखाली घुसले. वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाला.
या दुर्घटनेत डॉ. सय्यद आसिफ सय्यद उमर (वय 52) आणि त्यांची पत्नी डॉ. गुलसितां बी सय्यद आसिफ (वय 45) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, डॉ. आसिफ हे बदनापूर येथील नूर मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. डॉ आसीफ हे चैतन्य नगर गारखेडा येथे राहात होते तर ड्रायव्हर संजय नगर बायजीपुरा येथील आहे.
दरम्यान, अपघातानंतर तातडीने मदत आणि उपचार मिळाले असते तर मृतांचा जीव वाचू शकला असता, अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
वाचत राहा महाराष्ट्र वाणी — आपल्या परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी !