सईदा कॉलनीत वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा! DP चा फ्यूज वारंवार कट; ४० घरांवर अंधाराची वेळ
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १८ :- सईदा कॉलनी परिसरातील सईदा मस्जिदजवळील वीज वितरण व्यवस्थेचा प्रश्न नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या भागातील डीपीचा एक फ्यूज वारंवार कट होत असल्याने परिसरातील बहुतांश ठिकाणी वीज सुरू असतानाही सुमारे ३५ ते ४० घरांना मात्र अंधाराचा सामना करावा लागत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, फ्यूज कट झाल्यानंतर तो पुन्हा जोडण्यासाठी महावितरणकडून अनेकदा दोन ते चार तासांचा विलंब होतो. संबंधित वीज वितरण कार्यालयातील दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोनला प्रतिसाद मिळत नसल्याचीही तक्रार नागरिकांनी केली आहे. या परिस्थितीत उपअभियंता राठोड हेच फोन किंवा संदेशाला प्रतिसाद देत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
आजही रात्रीपासून ३५ ते ४० घरे अंधारात
आज रात्रीपासून सईदा मस्जिदजवळील डीपीचा फ्यूज कट झाल्याचे नागरिकांनी सांगितले. बराच वेळ उलटूनही फ्यूज दुरुस्त न झाल्यामुळे या भागातील ३५ ते ४० घरांतील नागरिकांना अंधारात राहावे लागले. विशेष म्हणजे आजूबाजूच्या परिसरातील पथदिवे व इतर भागातील वीजपुरवठा सुरू असताना केवळ या घरांमध्ये वीज नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
डीपीवरील अतिरिक्त भारामुळे समस्या?
नागरिकांच्या मते, याच डीपीवरील ४० क्रमांकाच्या पोलवर मोठ्या प्रमाणात वीज जोडण्या झाल्यामुळे वारंवार फ्यूज कट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ फ्यूज टाकण्याची तात्पुरती उपाययोजना न करता या समस्येच्या मुळाशी जाऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी होत आहे.
एक अतिरिक्त पोल उभारून भार विभागण्याची मागणी
वीजपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी संबंधित ठिकाणी एक अतिरिक्त पोल उभारून वीज जोडण्यांचा भार विभागावा, अशी मागणी सईदा कॉलनीतील नागरिकांनी केली आहे. वारंवार फ्यूज कट होणे आणि प्रत्येक वेळी नागरिकांना अनेक तास अंधारात राहावे लागणे, हा प्रकार थांबवण्यासाठी महावितरणने तातडीने तांत्रिक पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
उपअभियंता राठोड यांनी लक्ष देण्याची मागणी
या समस्येबाबत उपअभियंता राठोड यांना यापूर्वीही वारंवार माहिती देण्यात आल्याचे नागरिक सांगतात. मात्र, अद्याप कायमस्वरूपी तोडगा निघालेला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे राठोड यांनी स्वतः या प्रकरणाची पाहणी करून संबंधित कर्मचाऱ्यांना तातडीने सूचना द्याव्यात आणि सईदा कॉलनीतील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
फक्त फ्यूज टाकण्यापुरता प्रश्न न ठेवता, अतिरिक्त पोल व आवश्यक तांत्रिक सुधारणा करून नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा मिळवून द्यावा, अशी अपेक्षा सईदा कॉलनीतील रहिवाशांनी व्यक्त केली आहे