संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जरंडी ग्रामपंचायतीची राज्यस्तरीय तपासणी

छत्रपती संभाजीनगर विभागात द्वितीय क्रमांक; राज्याच्या पथकाकडून पाच तास विविध बाबींचे मूल्यमापन

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जरंडी ग्रामपंचायतीची राज्यस्तरीय तपासणी
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जरंडी ग्रामपंचायतीची राज्यस्तरीय तपासणी

छत्रपती संभाजीनगर, दि. २४ :- संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत सन २०२५-२६ च्या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर विभागातून द्वितीय क्रमांक मिळवलेल्या जरंडी ग्रामपंचायतीची गुरुवारी राज्यस्तरीय पथकाने सुमारे पाच तास तपासणी केली.

राज्यस्तरीय तपासणी समितीचे अध्यक्ष तथा राज्य पाणी व स्वच्छता मिशन, बेलापूरचे अतिरिक्त अभियान संचालक शेखर रौंदळ यांच्या नेतृत्वाखाली तन्वी जमदाडे, शुभम कोकणी, आशिष थोरात आणि स्वाती सूर्यवंशी यांनी ग्रामपंचायतीतील विविध कामांची पाहणी करून मूल्यमापन केले.

तपासणीदरम्यान घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व मैलागाळ व्यवस्थापन, प्लास्टिक व्यवस्थापन, गावातील परिसर स्वच्छता, शाळा व अंगणवाडी परिसर, शौचालयांची उपलब्धता व वापर, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सार्वजनिक शौचालये, वृक्षलागवड तसेच नागरिकांचा स्वच्छता उपक्रमांमधील सहभाग यांची पाहणी करण्यात आली.

याशिवाय ‘सेवा संकल्प अभियान’, ‘स्वच्छता ही सेवा’, ‘स्वच्छता पंधरवाडा’, ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ यांसह विविध उपक्रमांची अंमलबजावणी आणि त्यामध्ये ग्रामस्थांचा सहभाग याबाबतही समितीने माहिती घेतली.

ग्रामपंचायतीचे दस्तऐवज, अद्ययावत रेकॉर्ड आणि विविध प्रशासकीय नोंदींचीही तपासणी करण्यात आली. तसेच हुतात्मा स्मारक, स्मशानभूमी, पशुवैद्यकीय दवाखाना आणि प्राथमिक उपआरोग्य केंद्राची पाहणी करण्यात आली.

यावेळी जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेबराव चव्हाण, गटविकास अधिकारी शिवाजी एमूलवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी अशोक दौड यांच्यासह राजेंद्र सोनवणे, सत्यजित देशमुख, वैशाली जगताप, संजय वाघ, अभियंता राजेश राजगुरू, संजय शेवाळे, मोहन गिरी, अक्षय आहेर आणि संतोष जाधव उपस्थित होते.

ग्रामपंचायत अधिकारी सुनील मंगरुळे, संजीवन सोनवणे, संतोष पाटील, सतीश बाविस्कर आदींनी राज्यस्तरीय पथकाला ग्रामपंचायतीच्या विविध उपक्रमांची आणि स्वच्छता अभियानातील कामांची सविस्तर माहिती दिली.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित