शेतवस्तीवरील घरफोड्या आणि जबरी चोरीचा उलगडा; सराईत आरोपी जेरबंद, १.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) दि ६ :- शेतवस्तीवरील घरफोड्या आणि जबरी चोरीच्या दोन गंभीर गुन्ह्यांचा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी उलगडा करत एका सराईत आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून सोन्याचे दागिने, मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण १ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गंगापूर तालुक्यातील शींगी येथील रहिवासी एकनाथ जगन्नाथ वाघ (वय ५२) यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, १४ मे २०२६ रोजी रात्री कुटुंबीय झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. घरातील कपाट फोडून सुमारे ८५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी करून नेण्यात आले होते. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याचप्रमाणे, ९ एप्रिल २०२६ रोजी वैजापूर तालुक्यातील भगूर येथील बाबासाहेब गंगाधर काळे यांनी विरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या आई-वडिलांवर झोपेत असताना अज्ञात आरोपीने हल्ला करून आईच्या कानातील सुमारे ७० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने ओढून नेले होते. या प्रकारात महिलेच्या कानाला दुखापतही झाली होती.
या दोन्ही गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असताना, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे कार्तीक निजाम काळे व बबन निजाम काळे (रा. नरहरी रांजनगाव, ता. गंगापूर) यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला.
मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ४ जून २०२६ रोजी रात्री गंगापूर-वैजापूर मार्गावरील जाकमतवाडी रोड परिसरात सापळा रचला. त्यावेळी मोटारसायकलवरून येणाऱ्या कार्तीक निजाम काळे (वय ३५) याला ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत आरोपीने साथीदार बबन निजाम काळे याच्या मदतीने दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली. तसेच घरफोडी करून कानातील बाळ्या, वेल, नथ आणि झुमके चोरी केल्याचेही त्याने मान्य केले.
आरोपीच्या झडतीदरम्यान १ लाख ३५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेला मोबाईल फोन आणि स्प्लेंडर एनएक्सजी मोटारसायकल जप्त करण्यात आली. अशा प्रकारे एकूण १ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
अटक आरोपीला मुद्देमालासह गंगापूर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, पुढील तपास गंगापूर आणि विरगाव पोलीस करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश भा. जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे, कासीम शेख, सचिन राठोड, सुनील गोरे, पोलीस अंमलदार बलबीरसिंग बहुरे, शिवाजी मगर तसेच सायबर सेलच्या मेघा माळी, योगेश तरमळे आणि जीवन घोलप यांनी पार पाडली.
👉 अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी वाचत राहा – महाराष्ट्र वाणी!