शाळांच्या १०० यार्ड परिसरात तंबाखू विक्रीला ‘नो एन्ट्री’! जिल्हाधिकाऱ्यांचा कडक आदेश; शाळा परिसर तंबाखूमुक्त करण्याचे निर्देश
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. ७ :- विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि तंबाखूच्या व्यसनापासून युवा पिढीला दूर ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्थांचा परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रभावी व काटेकोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी दिले आहेत.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासह तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत व्यापक जनजागृती करण्यावर भर देण्यात आला.
बैठकीला अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पद्मजा सराफ, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी छाया आवरगावकर, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे आकाश तळवलकर, अन्न व औषध प्रशासनाचे डी. व्ही. पाटील, कामगार अधिकारी अक्षय ठोकळ यांच्यासह आरोग्य, शिक्षण, पोलीस आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गौडा यांनी स्पष्ट निर्देश देताना सांगितले की, शाळा व शैक्षणिक संस्थांच्या १०० यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होणार नाही, याची संबंधित यंत्रणांनी काटेकोर दक्षता घ्यावी. या प्रतिबंधाची प्रभावी अंमलबजावणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आवश्यक ती कारवाई करण्यात यावी.
प्रत्येक शाळा आणि शैक्षणिक संस्थेने तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्थेसाठी निश्चित करण्यात आलेल्या निकषांची पूर्तता करावी. यासाठी शिक्षण विभागासह संबंधित विभागांनी नियमित तपासणी व आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम (COTPA-२००३) ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विशेष पथके सक्रिय करण्यात यावीत. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमित कारवाई करावी, तसेच तंबाखूजन्य पदार्थांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जाहिराती आणि प्रायोजकत्वासंदर्भातील नियमभंगावरही कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.
तंबाखूविरोधी लढ्यात ग्रामपंचायती, शाळा-महाविद्यालये आणि विविध शासकीय विभागांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी गौडा यांनी केले. विशेषतः विद्यार्थी आणि युवकांना तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या गंभीर आरोग्यविषयक दुष्परिणामांची माहिती देण्यासाठी प्रभावी जनजागृती उपक्रम राबविण्यावर भर देण्यात आला.
बैठकीत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत विविध विभागांना देण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांचा तसेच आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. संबंधित विभागांनी आपल्या कारवाईचा अहवाल नियमितपणे जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाकडे सादर करावा, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
विद्यार्थ्यांचे भविष्य व्यसनमुक्त आणि निरोगी ठेवण्यासाठी आता शाळा परिसरातील तंबाखू विक्रीवर प्रशासनाची करडी नजर राहणार असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले आहे.