वाचन प्रेरणा दिनानिमित्त जिल्हा परिषदेत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १५ :- भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या वेरूळ सभागृहात वित्त विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम., अर्थ व बांधकाम सभापती सचिन गरड, समाजकल्याण सभापती बालाजी सोनटक्के, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रसाद जटाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राघवेंद्र घोरपडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी संघरत्न सरोदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगल पांचाळ, सहाय्यक संचालक (ग्रंथालय) सुनील हुसे, लेखाधिकारी संजय गादीकर, सुभाष वैद्य, जिल्हा परिषद सदस्य गायके, वरुण पाथरीकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. कलाम यांच्या जीवनप्रवासातून प्रेरणा घेण्याचे आवाहन
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. संजय गायकवाड यांनी डॉ. कलाम यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकला. त्यांची साधी राहणी, उच्च विचारसरणी, देशाविषयीचे प्रेम आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी दिलेले योगदान यांची माहिती देत त्यांनी वाचनाचे महत्त्व विशद केले. डॉ. कलाम यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन ज्ञानाची कास धरण्याचे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी डॉ. कलाम यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आणि राष्ट्राभिमानाचा उल्लेख केला. दर्जेदार शिक्षणासाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शिक्षणाधिकारी संघरत्न सरोदे यांच्या भाषणाचे त्यांनी कौतुक केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वाचनाला आपल्या दैनंदिन जीवनात महत्त्वाचे स्थान द्यावे, असा संदेश दिला. वाचनातून ज्ञानवृद्धी आणि व्यक्तिमत्त्व विकास साधता येतो, असेही त्यांनी अधोरेखित केले.
अर्थ व बांधकाम सभापती सचिन गरड यांनी महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, तसेच महापुरुषांचे विचार वाचून ते आचरणात आणावेत, असे आवाहन केले. समाजकल्याण सभापती बालाजी सोनटक्के यांनीही डॉ. कलाम यांच्या राष्ट्रासाठीच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीक्षांत खंडागळे यांनी केले, तर संजय इंगळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित