“लोकशाही सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावर तडफडते” – उद्धव ठाकरे यांची सरन्यायाधीश गवईंना विनंती

“लोकशाही सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावर तडफडते” – उद्धव ठाकरे यांची सरन्यायाधीश गवईंना विनंती

महाराष्ट्र वाणी न्युज 

मुंबई दि १४ :- मार्मिकच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य व देशातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर टोलेबाजी करत जोरदार भाष्य केले.

उद्धव ठाकरे म्हणाले, “मुंबईचा किंवा महाराष्ट्राचा लचका तोडण्याचा प्रयत्न अजूनही सुरू आहे. हे प्रयत्न थांबेपर्यंत शिवसेनेचं काम थांबणार नाही.” त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा मुद्दाही मांडला आणि सरकारवर लक्ष भरकटवण्याचा आरोप केला. “शेतकरी आत्महत्या करत आहेत, तरी चर्चा भटक्या कुत्र्यांवर किंवा कबुतरांवर वळवली जाते. भाजप नेत्या मनेका गांधी यांनी कुत्र्यांना डांबलं तर माकडं खाली येतील असं म्हटलं, आणि ती माकडं आता संसदेत बसली आहेत,” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.

सरन्यायाधीश बी. आर. गवई यांचा भटक्या कुत्र्यांच्या प्रकरणातील हस्तक्षेपाबद्दल आभार मानत उद्धव ठाकरे म्हणाले, “देशाची लोकशाही सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावर तडफडते आहे. तीन-चार वर्षांपासून खटला प्रलंबित आहे. आपण चौथे सरन्यायाधीश आहात. लोकशाहीच्या तोंडात न्यायाचं पाणी घाला, नाहीतर ती मरेल,” असे हात जोडून आवाहन त्यांनी केलं.

तसेच, सध्याच्या सत्ताधाऱ्यांवर टीका करताना ठाकरे म्हणाले, “विंचू चावला हे तोतया एकनाथांचं नाही, तर संत एकनाथांचं भारुड आहे. नोकऱ्या नाहीत, मतांची चोरी उघडकीस आली, तरी सर्व काही ठीक असल्याचं चित्र रंगवलं जातं. जय श्रीरामचा जयघोष करून पैशांच्या जोरावर धुमाकूळ घालणं, हेच या नासलेल्या सरकारचं धोरण आहे.”

मार्मिकच्या कार्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितलं की, व्यंगचित्रांच्या माध्यमातून समाजजागृती व अनिष्ट प्रथांवर प्रहार करण्याचं काम मार्मिकने नेहमीच केलं आहे.