लाडकी बहीण योजनेत मोठा प्रश्न: अपात्रांना गेलेले २१ हजार कोटी परत येणार का?
मुंबई दि २ :- राज्यातील गाजलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत धक्कादायक माहिती समोर आली आहे. शासनाच्या पडताळणीत तब्बल ७१ लाख महिला अपात्र ठरल्याचे स्पष्ट झाले असून, या अपात्र लाभार्थ्यांवर सरकारने सुमारे २१ हजार ३०० कोटी रुपयांचा खर्च केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे करदात्यांच्या पैशाचा मोठा अपव्यय झाल्याची चर्चा रंगली आहे.
या योजनेची पडताळणी मार्च २०२६ अखेर पूर्ण झाली. सुरुवातीला अर्ज करणाऱ्या महिलांची संख्या तब्बल २ कोटी ४७ लाख इतकी होती. अर्ज केलेल्या सर्व महिलांना दरमहा १५०० रुपयांचे अनुदान देण्यास सुरुवात करण्यात आली होती. या योजनेवर दरमहा सुमारे ३,६०० कोटींचा आर्थिक बोजा पडत होता.
दरम्यान, पडताळणी प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात गैरप्रकार उघडकीस आले. सरकारी नोकरीत असलेल्या महिला, वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक असलेले कुटुंब, चारचाकी वाहनधारक तसेच काही परराज्यातील महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले. त्यामुळे डेटा शुद्धीकरणाची गरज निर्माण झाली.
सरकारने केवायसीसाठी मुदतवाढ देत मार्च २०२६ पर्यंत प्रक्रिया सुरू ठेवली. अखेर १ कोटी ९० लाख महिलांनी केवायसी पूर्ण केली. त्यापैकी १ कोटी ७५ लाख महिला पात्र ठरल्या, तर उर्वरित ७१ लाख महिला अपात्र असल्याचे निश्चित झाले.
विशेष म्हणजे, या अपात्र महिलांना गेल्या सुमारे २० महिन्यांपासून दरमहा १५०० रुपये दिले जात होते. यामुळे एकूण खर्चाचा आकडा २१ हजार कोटींच्या पुढे गेला आहे. आता या खर्चाचे काय होणार, तसेच जबाबदारी कोणाची, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
राजकीय पार्श्वभूमी पाहता, ही योजना निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आली होती. त्यामुळे या निर्णयामागे राजकीय हेतू होता का, यावरही चर्चा सुरू झाली आहे.
आता सर्वांच्या नजरा सरकारच्या पुढील निर्णयावर; अपात्रांना दिलेला पैसा परत मिळणार का, हा खरा प्रश्न!