आठवडी बाजार बंद करण्याच्या प्रस्तावावर खासदार डॉ. कल्याण काळे आक्रमक; पुनर्विचाराची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि. ३१
चिकलठाणा, जाफरगेट आणि शहानुरमिया दर्गा परिसरातील पीर बाजार येथील आठवडी बाजार बंद करण्याच्या प्रस्तावावर खासदार डॉ. कल्याण काळे यांनी तीव्र भूमिका घेत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत तातडीने पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.
महानगरपालिकेकडून वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या पार्श्वभूमीवर हे बाजार बंद करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे समोर आले आहे. मात्र, या निर्णयाचे व्यापक सामाजिक आणि आर्थिक परिणाम होणार असल्याचा मुद्दा खासदार काळे यांनी अधोरेखित केला आहे.
या आठवडी बाजारांमुळे शहर आणि ग्रामीण भाग यांच्यातील अर्थचक्र सुरळीत चालते. अनेक शेतकरी आपला ताजा शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या बाजारांवर अवलंबून आहेत. बाजार बंद झाल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर थेट परिणाम होऊन त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
तसेच, शेकडो लघु आणि फिरते विक्रेते यांचा उदरनिर्वाहही या बाजारांवरच अवलंबून आहे. अचानक बाजार बंद केल्यास या घटकांवर मोठा आर्थिक आघात होणार असून त्यांच्या कुटुंबांवरही परिणाम होईल, अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
सामान्य नागरिकांनाही या बाजारांमधून ताजा भाजीपाला, फळे आणि जीवनावश्यक वस्तू परवडणाऱ्या दरात मिळतात. त्यामुळे बाजार बंद झाल्यास महागाईचा अतिरिक्त भार नागरिकांवर पडण्याची शक्यता आहे.
खासदार काळे यांनी प्रशासनाला चार प्रमुख मागण्या केल्या आहेत —
बाजार बंद करण्याच्या निर्णयाचा तातडीने पुनर्विचार करावा
वाहतूक व सुरक्षेच्या समस्यांवर नियोजनबद्ध उपाययोजना कराव्यात
स्थलांतर आवश्यक असल्यास सुसज्ज पर्यायी जागा उपलब्ध करावी
शेतकरी, व्यापारी आणि नागरिक प्रतिनिधींशी चर्चा करून निर्णय घ्यावा
हे प्रकरण हजारो कुटुंबांच्या उपजीविकेशी संबंधित असल्याने संवेदनशीलतेने आणि समतोल दृष्टिकोनातून निर्णय घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
आठवडी बाजारावरचा निर्णय काय ठरणार? शेतकरी-व्यापाऱ्यांचे भविष्य आता प्रशासनाच्या भूमिकेवर अवलंबून!