"राज्यातील तरुणांसाठी ‘सीट्रिपलआयटी’ केंद्र उभारण्याचे अजित पवारांचे निर्देश – आधुनिक प्रशिक्षणासाठी मोठा निर्णय"

"राज्यातील तरुणांसाठी ‘सीट्रिपलआयटी’ केंद्र उभारण्याचे अजित पवारांचे निर्देश – आधुनिक प्रशिक्षणासाठी मोठा निर्णय"

महाराष्ट्र वाणी न्युज 

मुंबई, दि. २४ जून :- राज्यातील युवकांना रोजगाराभिमुख व आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कौशल्य प्रशिक्षण मिळावे, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘सीट्रिपलआयटी’ म्हणजेच Center for Invention, Innovation, Incubation and Training केंद्र स्थापन करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

या उपक्रमासाठी आवश्यक असणारी जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)मार्फत उपलब्ध करून देण्यात यावी, तसेच प्रकल्पासाठी लागणाऱ्या निधीपैकी १५ टक्के निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून द्यावा, असे निर्देशही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.

या संदर्भातील आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. बैठकीस उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव व विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा, उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अन्बळगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव राजेश देशमुख यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या केंद्रांमुळे राज्यातील तरुणाईला नवउद्योजकता, नाविन्यपूर्ण कल्पना, तांत्रिक कौशल्ये आणि स्टार्टअप्ससाठी आवश्यक प्रशिक्षण मिळणार असून, भविष्यातील रोजगार संधी वाढण्यासही मोठी मदत होणार आहे.

 तरुणांना आधुनिक कौशल्यांच्या वाटेवर नेणारा महत्त्वपूर्ण निर्णय – 'सीट्रिपलआयटी'मुळे भविष्यातील संधी खुल्या!