रसायनशास्त्र विषयातून करिअरच्या संधींवर औद्योगिक संवाद; विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
महाराष्ट्र वाणी
जळगाव, दि. ५ :- इकरा एच. जे. थीम आर्ट्स अँड सायन्स कॉलेज, जळगाव येथील रसायनशास्त्र विभागाच्या वतीने “रसायनशास्त्र विषयातून करिअरच्या संधी” या विषयावर औद्योगिक संवाद कार्यक्रम उत्साहात पार पडला. दुपारी १२ वाजता आयोजित या कार्यक्रमास विभागातील विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी सैफ अली प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. सध्या ते सुहान केमिकल्स, एमआयडीसी जळगाव येथे सीनियर बॅच एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी रासायनिक उद्योग क्षेत्रातील आपले अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडत करिअर घडविण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये, ज्ञान आणि गुणवत्ता याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांनी उद्योग क्षेत्रातील कामकाजाची पद्धत, रसायनशास्त्र पदवीधरांसाठी उपलब्ध असलेल्या विविध करिअर संधी तसेच प्रात्यक्षिक ज्ञान, इंटर्नशिप आणि औद्योगिक प्रशिक्षणाचे महत्त्व यावर विशेष भर दिला. त्यामुळे हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. मुस्तकीम बागवान यांनी आभार मानले. यावेळी विभागप्रमुख डॉ. साजिद मलिक, डॉ. अख्तर शाह आणि मिस झैनब पटेल उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप विद्यार्थ्यांसोबत झालेल्या संवाद सत्राने झाला. या सत्रात विद्यार्थ्यांनी रासायनिक उद्योग क्षेत्रातील करिअर संधींबाबत विविध प्रश्न विचारले.
— शिक्षण आणि उद्योग यांची सांगड घालणारे असे उपक्रम विद्यार्थ्यांसाठी नव्या संधींचे दरवाजे उघडत आहेत.