महापालिकेचा थकबाकीदारांवर पुन्हा दणका!; एका दिवसात 13 मालमत्ता सील, 39.35 लाखांचा कर वसूल
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) डि ९ :- महापालिकेच्या कर वसुली मोहिमेला सलग चौथ्या आठवड्यातही मोठे यश मिळाले आहे. महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार गुरुवारी (9 जुलै) शहरातील सर्व 10 झोनमध्ये एकाच वेळी विशेष कर वसुली मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत तब्बल 13 थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्यात आल्या, तर 39.35 लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात आला.
आयुक्तांच्या सूचनेनुसार अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे आणि उपआयुक्त विकास नवाळे यांनी प्रत्येक झोनसाठी 15 ते 20 मोठ्या थकबाकीदारांची यादी तयार करून संबंधित पथकांना कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार दिवसभर विविध भागांत धडक मोहीम राबविण्यात आली.
झोननिहाय कारवाई :
झोन 3 : 1 मालमत्ता सील
झोन 5 : 2 मालमत्ता सील, 15.77 लाख रुपये कर वसूल
झोन 6 : 2 मालमत्ता सील, 7.08 लाख रुपये कर वसूल
झोन 7 : 2 लाख रुपये कर वसूल
झोन 9 : 2 मालमत्ता सील
झोन 10 : 6 मालमत्ता सील, 14.50 लाख रुपये कर वसूल
या मोहिमेत एकूण 13 मालमत्ता सील करण्यात आल्या असून 39.35 लाख रुपयांचा कर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे.
महापालिका प्रशासनाने मालमत्ता कर थकविणाऱ्या नागरिकांनी तातडीने कर भरावा, अन्यथा मालमत्ता सील करण्यासह पुढील कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.