मराठीभाषेत ज्ञानसाधनांची निर्मिती आवश्यक-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

मराठी विश्वकोश नोंद लेखन कार्यशाळा

मराठीभाषेत ज्ञानसाधनांची निर्मिती आवश्यक-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
मराठीभाषेत ज्ञानसाधनांची निर्मिती आवश्यक-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.४ :- विविध ज्ञान शाखांचे उच्चशिक्षण आपण इंग्रजी भाषेतून घेत असतो. या ज्ञानांची साधने ही आपल्या म्हणजेच मराठी भाषेतून असावीत. त्यासाठी सर्व विद्याशाखांचे ज्ञान हे मराठी भाषेत आणून विश्वकोश सारख्या मराठी ज्ञानसाधनांची निर्मिती आवश्यक आहे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले.

शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयात आज महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळातर्फे ‘वनस्पतीविज्ञान आणि भौतिकविज्ञान’ नोंदलेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. पंकजा वाघमारे अध्यक्षस्थानी होत्या. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे निवृत्त शास्त्रज्ञ विजय लाळे, शासकीय विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. राजेंद्र सातपुते, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. अशोक चव्हाण, प्रा. अरविंद धाबे, महाविद्यालयाचे माजीप्राचार्य डॉ. नवल थोरात, भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. बी.बी. राजेशेख, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुलोचना राठोड, विश्वकोश मंडळाचे विद्याव्यासंगी सहायक रविंद्र घोडराज, डॉ. स्नेहा खोब्रागडे आदी मान्यवर उपस्थित होते.

दीपप्रजवलनाने कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, मराठी विश्वकोश म्हणजे ज्ञानप्राप्तीचे विश्वासार्ह साधन होय. प्रत्येक संकल्पना विश्वकोशात अधिकृत मांडलेली असते. अलिकडच्या इंटरनेट युगात माहितीचे अनेक स्रोत आहेत. पण ह्या स्रोतातून मिळणारी माहिती अधिकृत असली पाहिजे. त्यासाठी ज्ञानालाआधार असावा लागतो. याशिवाय तयार केलेले ज्ञान हे सातत्याने अद्यावत केले गेले पाहिजे. नवनवीन संकल्पना, शोध, संशोधन यांचा त्यात समावेश करुन ज्ञान अद्यावतीकरण करणे आवश्यक आहे.बुद्धिला चालना देण्याचे कार्य ज्ञान करीत असते. अशी ही ज्ञानाचे साधने मराठी भाषेतून निर्माण होणे आवश्यक आहे,असेही त्यांनी यावेळी सांगितले.

अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ. पंकजा वाघमारे यांनी केला. सूत्रसंचालन रुपेश मडकर यांनी तर डॉ. सुहासिनी गेडेकर यांनी आभार मानले.