मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी एकजुटीने पाठपुरावा करणार : आमदार अब्दुल सत्तार
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १८ : मराठवाड्याच्या कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त व अवर्षणप्रवण भागाला हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी शासन स्तरावर प्रभावीपणे पाठपुरावा करू, अशी ग्वाही आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली.
मराठवाडा समन्यायी पाणीपुरवठा-पाणी वाटप संघर्ष समितीच्या वतीने डॉ. अण्णासाहेब शिंदे व इतर पदाधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या धरणे आंदोलनाला १७ सप्टेंबर रोजी आमदार अब्दुल सत्तार यांनी भेट देत पाठिंबा दर्शविला. यावेळी त्यांनी आंदोलकांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या व भूमिका जाणून घेतल्या.
पार-गोदावरी नदीजोड योजना तसेच कोकणातील उल्हास आणि वैतरणा खोऱ्यातील पश्चिम वाहिनी नद्यांचे मंजूर असलेले १५५ टीएमसी पाणी अडवून ते मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त व अवर्षणप्रवण तालुक्यांना समन्यायी पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी ठोस कार्यवाही करण्याची मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
मराठवाड्यातील शेतकरी सातत्याने पाणीटंचाई आणि सिंचनाच्या समस्येला सामोरे जात आहेत. त्यामुळे सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सूक्ष्म नियोजनासह नदीजोड प्रकल्प प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता आहे. वैतरणा खोऱ्यातील उपलब्ध पाणी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त भागाकडे वळविल्यास मराठवाड्याच्या मोठ्या क्षेत्राला दीर्घकालीन फायदा होऊ शकतो, असे सत्तार यांनी यावेळी सांगितले.
गोदावरी नदीच्या पात्रालगतचा परिसर वगळता मराठवाड्याचा मोठा भाग आजही दुष्काळाच्या समस्येला सामोरा जात आहे. त्यामुळे सिंचनाचा अनुशेष दूर करण्याबरोबरच मराठवाड्याच्या पाणी प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
या प्रश्नावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी ठोस पाठपुरावा करण्याचे आश्वासनही आमदार सत्तार यांनी दिले. मराठवाड्याला पुरेसे सिंचनाचे पाणी उपलब्ध झाल्यास शेतीला स्थैर्य मिळेल आणि या भागाच्या आर्थिक व सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.