बुलढाण्यातून आणला जाणारा प्रतिबंधित गुटखा जप्त; १५.१९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची कारवाई; स्थानिक गुन्हे शाखेने एकाला पकडले, साथीदाराचा शोध सुरू

बुलढाण्यातून आणला जाणारा प्रतिबंधित गुटखा जप्त; १५.१९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २९ :- महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या पानमसाला व सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्या टोळीवर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. अजिंठा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवना येथे सापळा रचून पोलिसांनी पांढऱ्या रंगाची हुंडाई क्रेटा कार अडवली. या कारवाईत ५ लाख १९ हजार २०० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि अंदाजे १० लाख रुपये किमतीची कार असा एकूण १५ लाख १९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्या साथीदाराचाही सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

गुप्त माहितीच्या आधारे शिवना येथे सापळा

दि. २६ ऑक्टोबर रोजी झालेल्या गुन्हे आढावा बैठकीत पोलीस अधीक्षक प्रकाश भा. जाधव यांनी अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून माहिती संकलित करण्यास सुरुवात केली होती.

दि. २९ ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक प्रतिबंधित गुटख्याची बाहेरील जिल्ह्यांतून होणारी वाहतूक रोखण्यासाठी कार्यरत होते. याचदरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातून नवीन कारमध्ये प्रतिबंधित गुटखा भरून शिवना मार्गे अजिंठा व सिल्लोडकडे विक्रीसाठी नेण्यात येणार असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शिवना येथे सापळा रचला.

५.१९ लाखांचा गुटखा, १० लाखांची कार जप्त

गुरुवारी सकाळी सुमारे ७ वाजता बुलढाण्याकडून येणारी एमएच-२०-जीव्ही-९४०८ क्रमांकाची पांढऱ्या रंगाची हुंडाई क्रेटा कार पोलिसांनी अडवली. वाहनाची तपासणी केली असता, त्यातील गोण्यांमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला पानमसाला व सुगंधित तंबाखू आढळून आला.

चालकाने आपले नाव सादिक कडू पठाण (वय ३३, रा. तुर्काबाद खराडी, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) असे सांगितले. पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गुटखा आणि वाहन जप्त केले.

या प्रकरणात सादिक कडू पठाण याने मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथील धीरज मालवाणी याच्यासोबत संगनमत करून महाराष्ट्रात प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखूची विनापरवाना वाहतूक केल्याचा आरोप आहे.

अजिंठा पोलिसांकडून पुढील तपास

ताब्यात घेतलेल्या सादिक कडू पठाण याला जप्त केलेल्या मुद्देमालासह अजिंठा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अजिंठा पोलीस करीत असून, अन्य संबंधित व्यक्तींच्या भूमिकेचाही तपास केला जात आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

पोलीस अधीक्षक प्रकाश भा. जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे, पोलीस हवालदार गोपाल पाटील, संतोष डोंगरे तसेच पोलीस अंमलदार बलवीरसिंग बहुरे, शिवाजी मगर, योगेश तरमळे आणि जीवन घोलप यांनी ही कारवाई केली.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित